Crime | शेतात येण्यास मज्जाव करत वृद्ध शेतकऱ्याला मारहाण; छातीवर लाथाबुक्यांनी हल्ला करून खून, पाच जणांवर गुन्हा

खेड तालुक्यातील भांबुरवाडीतील शेतजमिनीच्या वादातून हिंसक घटना "तुम्ही शेतात यायचे नाही" म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी मारहाणीनंतर गंभीर जखमी; खासगी हॉस्पिटलमध्ये प्राण गमावले

Crime | शेतात येण्यास मज्जाव करत वृद्ध शेतकऱ्याला मारहाण; छातीवर लाथाबुक्यांनी हल्ला करून खून, पाच जणांवर गुन्हा

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील भांबुरवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथे शेतात येण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून पाच जणांनी वृद्ध शेतकरी दांपत्यावर क्रूर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ७५ वर्षीय शेतकरी सोपान तुकाराम भांबुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून राजगुरूनगर पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास भांबुरवाडी गावाच्या हद्दीतील 'दरा' नावाच्या शेतात घडली. मृतक सोपान भांबुरे यांच्या पत्नी चंद्रकला सोपान भांबुरे (वय ५८) यांनी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा रामदास भांबुरे शेतातून गहू घरी नेण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेतात असलेल्या सोपान भांबुरे आणि चंद्रकला यांच्याकडे शिवाजी पांडूरंग भांबुरे, किरण शिवाजी भांबुरे, आशा सुभाष भांबुरे, सोनाली किरण भांबुरे आणि अरुणा शिवाजी भांबुरे (सर्व रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड, जि. पुणे) हे पाच जण आले.

 

 

या सर्वांनी संगणमताने "तुम्ही या शेतात यायचे नाही" असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी सोपान भांबुरे आणि चंद्रकला यांच्यावर हाताने, लाथा-बुक्यांनी जोरदार मारहाण सुरू केली. सोपान भांबुरे खाली पडल्यानंतरही सर्वांनी त्यांच्या छातीवर लाथाबुक्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

 

मारहाणीमुळे सोपान भांबुरे यांना चक्कर आली आणि ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा रामदास भांबुरे आणि नातू सार्थक काळूराम भांबुरे यांनी त्यांना प्रथम धन्वंतरी हॉस्पिटल, राक्षेवाडी (ता. खेड) येथे आणि नंतर गावडे हॉस्पिटल, राजगुरूनगर येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सोपान भांबुरे यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेची सविस्तर माहिती देत चंद्रकला भांबुरे यांनी वरील पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार राजगुरूनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०३ (१) (खुन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिसोदे करीत आहेत.