क्रिकेट शिस्त, कर्तव्य आणि सहकार्य शिकवते - सुनंदन लेले

क्रिकेट शिस्त, कर्तव्य आणि सहकार्य शिकवते - सुनंदन लेले

राजगुरूनगर : क्रिकेट ही संस्कृती असून ते शिस्त, कर्तव्य, प्रयत्नवाद आणि सहकार्य शिकवते असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत क्रिकेटने मला काय शिकवले ? या विषयावर बोलत होते.

याप्रसंगी खेड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुरेश राजूरकर, संस्था अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, ॲड. राजमाला बुट्टेपाटील, मंजिरी लेले, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, डॉ.एच.एम.जरे,  उपप्राचार्य प्रा. व्ही. बी. दौंडकर, प्रबंधक के.आर.पाचारणे उपस्थित होते. 

सुनंदन लेले पुढे म्हणाले, की क्रिकेट हा खेळ सांघिक असून त्यातील यशापयश हे क्षणभंगुर असते. सराव व साधना करून यश मिळवता येते. क्रिकेटमध्ये समन्वय व सांघिकता आवश्यक असून हा खेळ दुसऱ्याच्या यशात आनंद घेण्याची वृत्ती वाढवितो. जबाबदारीची जाणीव, नेतृत्व गुण, बोलणे-वागण्यातील परिपक्वता, संयम या गोष्टी क्रिकेटमुळे शिकायला मिळतात. क्रिकेटमध्ये कष्ट करून यश मिळेलच असे नसते. त्यामुळे सातत्याने प्रयत्नवादी राहून संकटाचे संधीत रूपांतर करावे लागते. खेळाडूने अथवा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने अगोदर एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करावा. खेळाडूची कारकीर्द ही अल्प असल्याने त्याचा स्वभाव, वागणूक समाजात आदर निर्माण करीत असते. खेळाडूकडे गुणवत्तेबरोबर मेहनत आवश्यक असून विद्यार्थ्यांनी क्षेत्र कोणतेही असो कठोर मेहनतीने स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे व आपल्या अस्तित्व निर्माण करावे असे आवाहन केले. त्यांनी या वेळी  दृकश्राव्य तंत्राचा आधार घेत सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड, रोहित शर्मा यांच्या मुलाखतींचा काही  भाग विद्यार्थ्यांना दाखविला व त्यांचे नेतृत्वगुण, सातत्याने कष्ट करण्याची वृत्ती स्वभावगुणावर प्रकाश टाकला. 

सूत्रसंचालन डॉ. कैलास सोनवणे यांनी,परिचय प्रा. ज्योती वाळुंज यांनी तर आभार अक्षदा कोळेकर हिने मानले.