खेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पंचनामे त्वरित पूर्ण करून भरपाई द्या, वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि दरडप्रवण भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची मागणी.
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. रस्ते वाहून गेलेल्या ठिकाणची त्वरित दुरुस्ती करावी व दरड प्रवण क्षेत्रांतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. याबाबतचे पत्र खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देऊन उपाययोजना करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
खेड आळंदी मतदारसंघात गेली दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे,भातखाचरांचे व शेतजमिनीचे वाहून जाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.अनेक गावांत ओढ्यांच्या, नदीच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीकडेचे बांधकाम वाहून जावून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत रस्त्याचा काही भाग वाहून जावून रस्ता धोकादायक झालेला आहे. अनेक ठिकाणी बंधाऱ्यांचे ढापे न काढल्याने जवळच्या लगत असणाऱ्या घरांमध्ये पाणीशिरून नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच अनेक भागांतील रस्ते वाहून गेल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये तात्काळ पंचनामे होऊन सदर बाधित शेतकरी व नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. तसेच रस्ते वाहून जनजीवन विस्कळीत झालेल्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे तात्काळ स्थलांतरण करण्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश निर्गमित करावेत. अशी मागणी मोहिते पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी डुडी यांना केली.