Advocate Sanjay Panmand | पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांची कणखर भूमिका महत्वाची : ॲड. संजय पानमंद
कै.निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
महावार्ता लाईव्ह | अन्याय झालेल्या व्यक्तीने न्याय मिळविण्यासाठी वकिलामार्फत कोर्टात दावा दाखल केल्यानंतर वकिलांनी न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करताना आपल्यातील कौशल्य पणाला लावून आपल्या पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देण्याची कणखर भूमिका घेऊन न्याय मिळवून दिला पाहिजे, असे प्रतिपादन राजगुरूनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय पानमंद यांनी केले.
कै. निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. पानमंद बोलत होते. यावेळी नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. एन. डी. पिंगळे, सचिव शीतल टिळेकर, ॲड. गोपाळ शिंदे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता भालेराव, प्राचार्य मीरा जानराव, प्रा. महेंद्र खरात, प्रा. संतोष बुट्टे, प्रा. ज्ञानेश्वर दुधवडे, प्रा. जावेद तांबोळी, हौशीराम वाळुंज यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड. पानमंद बोलताना पुढे म्हणाले, कोर्टात न्यायाधीशांसमोर वकिलांनी पक्षकाराची बाजू भक्कमपणे मांडून न्याय मिळवून देण्याची भूमिका महत्त्वाची आहे. वकिलामार्फत न्याय मिळाल्याने पक्षकाराला समाधान वाटते. कोणत्याही क्षेत्रात स्पष्ट भूमिका घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे. आपल्या पक्षकाराला न्याय देण्यासाठी तडजोड करता कामा नये.
समाज वकिलांकडे योग्य सल्लागार म्हणून पाहतो, म्हणून कायद्याचे प्रगल्भ ज्ञान प्रत्येकाला असले पाहिजे. न्यायासाठी युक्तिवाद करताना वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजात वकिलांना मानसन्मान आणि महत्त्वदेखील आहे. न्याय मिळवून दिला नाही की पक्षकार म्हणतो, आमचा वकील कमी पडला किंवा फुटला, अशी बोलण्याची संधी वकिलांनी पक्षकाराला देऊ नये. कोणत्याही क्षेत्रात वकिलांचा सल्ला महत्त्वाचा मानतात, असे ॲड. संजय पानमंद यांनी भाषणात सांगितले.

यावेळी ॲड. एन. डी. पिंगळे, दत्ता भालेराव, ॲड. गोपाळ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. महेंद्र खरात यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शरद दरेकर व समृद्धी मुंगसे यांनी केले. आभार अनिल नरसिंगे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.