Kindness Over Celebration | दुष्काळातही माणुसकी जपली! दीप्ती भोगाडे यांचा ठाकरवाडीतील चिमुकल्यांसोबत वाढदिवस

वाढदिवसाचा गाजावाजा टाळत साधेपणाने साजरा; जिल्हा परिषद शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Kindness Over Celebration | दुष्काळातही माणुसकी जपली! दीप्ती भोगाडे यांचा ठाकरवाडीतील चिमुकल्यांसोबत वाढदिवस

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील वाफगाव-रेटवडी जिल्हा परिषद गटात यंदा पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. गुळाणी, वाफगाव, वरुडे आणि वाकळवाडी परिसरातील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या परिस्थितीचे भान ठेवत जिल्हा परिषद सदस्या दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी वाढदिवसाचा कोणताही गाजावाजा न करता ठाकरवाडीतील चिमुकल्यांसोबत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.

 

ठाकरवाडीतील मुलांसोबत केक कापला

दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नसल्याने दीप्ती भोगाडे यांनी दुर्गम ठाकरवाडीला भेट दिली. तेथील लहान मुलांसोबत केक कापून त्यांनी आनंदाचे क्षण साजरे केले.

 

 

“शेतकरी बांधव दुष्काळाने त्रस्त असताना मला मोठा वाढदिवस साजरा करणे योग्य वाटले नाही. माझा आनंद या लेकरांच्या आनंदात आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

जिल्हा परिषद शाळांची पाहणी

वाढदिवसानिमित्त त्यांनी जिल्हा परिषद शाळांनाही भेट दिली. शाळेची पाहणी करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शैक्षणिक अडचणी आणि आवश्यक सुविधांची माहिती घेतली.

 

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत वाढदिवसाचा दिखावा टाळून ठाकरवाडीतील चिमुकल्यांसोबत आनंद वाटून घेण्याचा दीप्ती भोगाडे यांचा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला. त्यांच्या या साधेपणाचे आणि संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत असून, वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांनी माणुसकीचा सुंदर संदेश दिला.