Criminal arrested in Sarait | विवाहबाह्य प्रेयसी व मुलाला ठार मारून मृतदेह जाळला : सराईत गुन्हेगार अटकेत ; उसाच्या शेतातून पळताना नदीकाठावर मुसक्या आवळल्या

खेड तालुक्यातील शिरोली व जैदवाडी खून प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन आरोपी अटकेत ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी ; तीन खून उघड

Criminal arrested in Sarait | विवाहबाह्य प्रेयसी व मुलाला ठार मारून मृतदेह जाळला : सराईत गुन्हेगार अटकेत ; उसाच्या शेतातून पळताना नदीकाठावर मुसक्या आवळल्या

 

महावार्ता लाईव्ह | पैशाचा सतत तगादा लावणाऱ्या आपल्या विवाहबाह्य प्रेयसी व तिच्या मुलाचा काटा काढण्यासाठी सराईत गुन्हेगाराने त्यांचा निर्घृण खून केला. एका खूनाच्या तपासात आणखी दोन खून उघडकीस आल्याने खेड पोलिस ठाण्यात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात तीन खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे एकूण ३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

 

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरोपींना पकडण्यासाठी खेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) अधिकाऱ्यांना बारामती (वडगाव निंबाळकर) पर्यंत १४५ किलोमीटर अंतरावर सलग सहा दिवस ११० सीसीटीव्ही फुटेज तपासावे लागले.

 

खूनाच्या तपासात आणखी दोन खून उघड

गेल्या महिन्यात १८ तारखेला खेड तालुक्यातील जैदवाडी येथे धनंजय मारूती घेवडे (वय ३३, रा. राक्षेवाडी, ता. खेड, मूळ रा. कारेगाव ता. आंबेगाव) याचा खून झाला होता. हा तपास खेड पोलिसांसह एलसीबी करत होती. खून झालेले ठिकाण डोंगराळ भागात असल्याने तेथे सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सराईत गुन्हेगार ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. शिंदेवस्ती, शिरोली, ता. खेड) व त्याचा साथीदार नंदलाल दिलीप होले (वय ३१, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) दिसले.

 

संशयावरून पोलिसांनी जवळपास दीडशे किलोमीटरपर्यंत ११० सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपी वडगाव निंबाळकर येथे असल्याचे समजले. तेथे जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघे उसाच्या शेतातून नदीच्या दिशेने पळाले. नदीत उडी मारण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांची मुसक्या आवळल्या. चौकशीत दोघांनी घेवडे याचा लोखंडी रॉड व दगडाने खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यासाठी निलेश कैलास सणस (वय ३४, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) याने पैसे पुरविल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.

 

 प्रेयसी व मुलाचा खून

खोल्लम हा ३५ गंभीर गुन्ह्यांचा सराईत गुन्हेगार असल्याने त्याची सखोल चौकशी केली. त्यात गेल्या वर्षी त्याने आपल्या विवाहबाह्य संबंधातील प्रेयसी रुपाली विलास वाडेकर (वय ४६, रा. शिरोली, ता. खेड) व तिचा मुलगा श्रीकांत (वय २६) यांचाही खून केल्याचे समोर आले. दोघेही पैशाचा सतत तगादा लावत असल्याने खोल्लम वैतागला होता.

 

▪️श्रीकांतचा खून :गेल्या वर्षी ७ नोव्हेंबरला खोल्लमने श्रीकांतचे अपहरण केले. त्याला शिरोलीतील आपल्या फ्लॅटवर नेले आणि लोखंडी रॉडने ठार मारले. नंदलाल होलेच्या मदतीने मृतदेह मंचर येथे नेून जाळून टाकला.

 

▪️ रुपालीचा खून : मुलगा कुठे आहे, अशी चौकशी करणाऱ्या रुपालीला १३ नोव्हेंबरला ठाणे येथे बोलावले. नंतर तिला शिरोलीच्या फ्लॅटवर नेले आणि चाकूने गळा कापून खून केला.

 

▪️धनंजय घेवडे खून : गावातील पूर्ववैमनस्यातून आरोपींनी धनंजय घेवडे याला लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून मारले व पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे जाळून मोबाईल विहिरीत फेकून दिला. 

पोलिसांनी खोल्लमकडून मध्य प्रदेशातून आणलेली दोन गावठी पिस्तुले व चार काडतुसे हस्तगत केली आहेत.

 

ही कामगिरी एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, खेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण व त्यांच्या पथकाने केली. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले.