खेड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

१८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

खेड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम संपताच आता तालुक्यातील अतिशय  महत्वाच्या २३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  सध्या गावागावांतून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे.आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. 

खेड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीची ऑक्टोंबर - २०२२ ते डिसेंबर-२०२२ मुदत संपणार आहे. त्यामुळे थेट जनतेतुन सरपंच होणार असल्यामुळे गावा-गावामध्ये चुरस निर्माण झाली आहे. इच्छुक आता घुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. गावकी-भावकीच्या सुखदुःखात हजेरी लावून एक प्रकारे आपल्या सरपंच पदाची जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.  गेल्या दोन तीन महिन्यापासून इच्छुक तयारी लागले आहेत मागील काही दिवसांपूर्वी एका गावातील आजी सरपंच यांनी चक्क ६०० गावातील लोकांना बालाजीचे दर्शन करण्यासाठी नेले होते. त्याच प्रमाणे प्रत्येक गावात देव दर्शन ट्रिप काढताना तर कुठे फराळ वाटपाचा कार्यक्रम, होम मिनिस्टर आदींचा कार्यक्रम गावा-गावात दिसत आहे.

गावामध्ये कोरोनाच्या संकट काळात ज्या कार्यकर्त्यांनी समाजसेवा केली अशाच व्यक्तींना निवडून देण्याचा मतदारांचा सूर पाहण्यास मिळतात आहे. सर्व इच्छुक गेली दोन-तीन महिने जोरदार तयारी केल्याची दिसत आहे.

खेड तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे- येणिवे खु, गारगोटवाडी, येलवाडी, कोरेगाव खुर्द, चास, भांबोली, बहुळ, देवोशी, मांजरेवाडी, शिरोली, सुरकुंडी, आनवळे, बहिरवाडी, आंबू, आव्हाट, दौंडकरवाडी, मिरजेवाडी, वाडा,पापळवाडी, सिद्वेगव्हाण, साकुर्डी, शेलगाव, साबळेवाडी

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी दिली.
निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या दरम्यान सादर केले जातील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.