khed Police | सराईत गुन्हेगार ‘डॉलर’ एम.पी.डी.ए. अंतर्गत एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध
कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा ; अशा प्रकारच्या गुंडगिरी व दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा
महावार्ता लाईव्ह | सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ ‘डॉलर’ सिताराम ओव्हाळ (वय ३३ मौजे वाळद ता. खेड जि. पुणे (सद्य. रा. चांडोली ) याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षाकरिता नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, जबर मारहाण, दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे सहा गंभीर गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे, गंभीर गुन्हे करणारे व सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिल्या होत्या. त्यानुसार खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी ओव्हाळविरोधात एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठवण्यात आला.
सदर प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करून, ओव्हाळ हा सार्वजनिक शांततेस व नागरिकांच्या सुरक्षेस गंभीर धोका असल्याचे लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी आदेश काढला. त्यानुसार १३ ऑगस्ट २०२५ रोजी खेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ओव्हाळला ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाहीत पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण (खेड पोलीस स्टेशन) तसेच दोन्ही युनिटमधील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, अशा प्रकारच्या गुंडगिरी व दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
