Khed Crime | जैदवाडीत बेपत्ता तरुणाचा डोक्यात-तोंडावर वार करून खून ; तीन दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
गूढ वाढले ! बेपत्ता तरुणाचा खून, कारण अद्याप अस्पष्ट ; तीन दिवस बेपत्ता… अखेर मृतदेह सापडला; खेड तालुक्यात खळबळ
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत एका ३३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मूळ आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील धनंजय मारुती घेवडे (वय ३३, सध्या रा. राक्षेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि. १८) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय घेवडे हा १६ मार्च रोजी रात्री ९ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू असतानाच जैदवाडी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याच्या डोक्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने चार घाव घालण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनास्थळी सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. तसेच मृतदेहाजवळ त्याची दुचाकीही आढळून आली आहे. या घटनेवरून हा खून अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूरपणे करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, अद्याप खुनी कोण आहे आणि खुनामागील नेमके कारण काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.