केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात खेड तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची घणाघाती टीका.लखीमपूर घटनेचा कँडल मार्चद्वारे निषेध.
राजगुरूनगर : प्रतिनिधी
पंतप्रधान मोदींना उद्योगपती अंबानींना भेटायला वेळ आहे, परंतु देशातील शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.शेतकरी विरोधी केलेले कायदे मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांची असताना त्यांचा आवाज दाबला जातोय आणि शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचे कृत्य केले जाते.महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असून पंतप्रधान निद्रावस्थेत आहेत,असा घणाघाती हल्लाबोल खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय डोळस यांनी केला आणि लखीमपूर येथे आठ आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना चिरडल्याचा जाहीर निषेधही केला.कँडल मार्च प्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा उपस्थितांनी दिल्या.

उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर येथे आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडल्याचा निषेध करण्यासाठी खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राजगुरूनगर येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धा कृती पुतळ्यासमोर झालेल्या कँडल मार्च व निषेध सभेत डोळस बोलत होते.यावेळी पुणे जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परीषद सदस्या वंदना सातपुते,पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे,राजगुरूनगर बँकेचे जेष्ठ संचालक किरणदादा आहेर,भीमशक्ती तालुकाध्यक्ष अनिल जाधव आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------
वंदना सातपुते–जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस-
शेतकरी विरोधी धोरण राबविणारे केंद्रातील भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे.केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकरी आंदोलनात मोटार घालून आठ निष्पाप शेतकऱ्यांचा जीव घेतला ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे.तात्काळ गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी वंदना सातपुते यांनी केली.
-------------------------------------------------------------------------------
सतीश राक्षे–माजी उपसभापती-
महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे.शेतकरी उद्धवस्थ करण्याचे धोरण भाजपा सरकारचे असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. आठ शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना लाजास्पद असून या घटनेचा निषेध करण्यापेक्षा गुन्हेगाराला तात्काळ अटक करून फासावर लटकवले पाहिजे,अशी मागणी माजी उपसभापती सतीश राक्षे यांनी केली.
--------------------------------------------------------------------------------
खेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त कडक होता. यावेळी मागण्यांचे निवेदन लाड यांना देण्यात आले.आभार अनिल जाधव यांनी मानले.
