Khed Taluka | करंजविहिरे–वांद्रे रस्त्याची दुरवस्था; सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा, PMRDA व PWD वर दुर्लक्षाचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिका, चाकण नगर परिषद आणि विविध पाइपलाइन कामांमुळे रस्त्याची चाळण; जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना निवेदन देणार

Khed Taluka | करंजविहिरे–वांद्रे रस्त्याची दुरवस्था; सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा, PMRDA व PWD वर दुर्लक्षाचा आरोप

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविहिरे ते वांद्रे या प्रमुख जिल्हा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाईपलाईनचे काम सुरू असून, विविध ठिकाणी रस्ता खोदण्यात आल्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची पाईपलाईन, पुणे महानगरपालिकेची पाणीपुरवठा लाईन तसेच चाकण नगरपरिषदेची लाईन अशा विविध यंत्रणांची कामे सुरू असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी धूळ, चिखल, खड्डे आणि वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

 

नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेत, करंजविहिरे ते वाकी हा संपूर्ण रस्ता संबंधित यंत्रणांनी लेखी जबाबदारी स्वीकारून दर्जेदार पद्धतीने तयार करून द्यावा. तोपर्यंत पाईपलाईनचे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

 

हा मार्ग भीमाशंकर तीर्थक्षेत्र तसेच वांद्रे पर्यटन स्थळाकडे जाणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग असल्याने दररोज हजारो भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास अत्यंत धोकादायक आणि त्रासदायक झाला आहे.

 

नागरिकांनी या प्रश्नाकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

 

या पार्श्वभूमीवर करंजविहिरे ते वांद्रे परिसरातील सर्वपक्षीय नागरिकांनी एकदिवसीय आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनापूर्वी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, PMRDA, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि चाकण नगर परिषद यांना लेखी निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

नागरिकांनी प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.