Teacher Award | शिक्षक रोहिदास राक्षे यांना ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; राक्षेवाडी, खरपुडी परिसरातून राक्षे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव ; पुण्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
महावार्ता लाईव्ह | शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेड तालुक्यातील राक्षेवाडीचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद शाळा आंबेओहळ (खरपुडी बु.) येथील आदर्श शिक्षक रोहिदास लक्ष्मण राक्षे यांना सन २०२६ चा ग्रीन वर्ल्ड डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन आणि जाधवर ग्रुप यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रोहिदास राक्षे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम कोतवाल, जाधवर ग्रुपचे सर्वेसर्वा शार्दूलराव जाधव, ज्ञानेश्वर किहीलीरे (IAS), अतिरिक्त आयुक्त, Settlement & Director of Land Records, महाराष्ट्र राज्य, उदय बोरावके सर तसेच डॉ. पराग केळकर सर, मा. उपकुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी मान्यवर उपस्थित होते.
रोहिदास राक्षे यांनी शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राक्षे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राक्षेवाडी, खरपुडी आणि ढोरेभांबुरवाडी परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षण क्षेत्रातील सहकारी आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.