Bibttya attack | चिमुकल्यावर हल्ला, आईच्या धैर्यामुळे जीव वाचला
खेड तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; निमगावमध्ये चिमुकल्यावर हल्ला
Bibttya attack nimgav khed
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील निमगाव (ता. खेड) गावात घाटवस्ती येथे मंगळवारी (दि. २५) संध्याकाळी पुन्हा एकदा बिबट्याने थरकाप उडवून दिला. घराच्या अंगणात खेळत असलेल्या अवघ्या ५ वर्षीय चिमुकल्या मुलावर बिबट्याने अचानक झडप घेतली आणि मानेवर पकडून ओढत नेले. ही भयानक घटना मुलीच्या आईसमोरच घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र आईने प्रचंड धैर्य दाखवत बिबट्याच्या मागे धावत जाऊन मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या घाबरून मुलाला सोडून डोंगराकडे पळून गेला.
निमगाव ( घाटवस्ती ) येथील रहिवासी योगेश गव्हाणे यांचा ५ वर्षीय देवांश हा चिमुकला संध्याकाळी साधारण ८.३० वाजता घरासमोरच्या अंगणात खेळत होता. त्या वेळी त्याची आई घरात काम करत होती. अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्यावर झडप घातली. बिबट्याने त्याला मानेवर पकडून काही १०० मीटर अंतर ओढत नेत असताना चिमुकलीच्या तोंडातून किंचाळल्याचा आवाज ऐकून आई धावत बाहेर आली आणि बिबट्याला आपला मुलगा ओढत नेताना पाहून ती ओरडली, “बिबट्या! बिबट्या!” आणि त्याच्या मागे पळत सुटली. घरातील कुटुंबातील लोकांनी मोठ्या प्रमाणात ओरड केल्याने बिबट्या घाबरला आणि देवांशला शेताच्या चारित सोडून डोंगराच्या दिशेने शेतात पळून गेला.
जखमी चिमुकलाला तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, चिमुकल्याच्या मानेवर आणि खांद्यावर खोल जखमा आहेत, पण मुलाची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. घटनेची माहिती मिळताच खेड वन परिक्षेत्र अधिकारी व वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी भोंडवेवस्ती येथे दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. घाटवस्ती येथे चार पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनपाल अधिकारी गुलाब मुके व वनरक्षक सागर तांबे यांनी दिली.
मागील आठवड्यातच निमगाव गावात भोंडवेवस्ती येथे शेतात बिबट्याने यश गणेश भोंडवे १५ वर्षांच्या मुलावर हल्ला चढवला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी मोठा गोंधळ करून बिबट्याला पळवून लावले होते. त्यानंतरही बिबट्याचा वावर कायम असल्याने गावकरी सतर्क होते, तरीही ही दुसरी घटना घडल्याने संताप आणि भीती दोन्ही नागरिकांमध्ये वाढले आहेत.
