Alandi double Murder | आळंदीत दुहेरी हत्याकांड: ६ वर्षांच्या चिमुकली व ७० वर्षीय वृद्धेचा खून करणारा आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची तत्पर कारवाई; कौटुंबिक कलहातून घडली घटना
महावार्ता लाईव्ह | आळंदी (पुणे) तीर्थक्षेत्र आळंदी येथील हनुमानवाडी ठाकरवस्ती येथे २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी एका ६ वर्षांच्या लहान मुलीचा आणि ७० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतल्याने स्थानिक स्तरावरून पोलिसांच्या तपास कौशल्याची प्रशंसा होत आहे.
घटना अशी की, फिर्यादी संगीता दत्तात्रय केदारी (इंद्रायणी हॉस्पिटल, आळंदी येथे रात्रीच्या साफसफाईच्या कामाला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या रात्रीच्या ड्यूटीवर असताना त्यांच्या ६ वर्षांच्या नातीस कु. धनश्री सोनू केदारी व त्यांची शेजारी राहणाऱ्या मावशी मंगल चंद्रकांत शिंदे (वय ७०) या दोघी घरात एकट्या होत्या. दि. १ एप्रिल रात्री ८ वाजेपासून ते २ एप्रिल सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून दोघींना जिवे मारले. घरात परत आल्यावर संगीता यांना हे भयानक दृश्य दिसले. त्यांनी प्राथमिक तपासात विनायक भवारी या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता.
या घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस स्टेशन व पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या विविध पथकांना तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. आरोपी आळेफाटा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पुणे-नाशिक रोडवरील हॉटेल रामाधान जवळील ठिकाणाहून आरोपी विनायक तुकाराम भवारी (वय ३१ वर्ष, धंदा - सेंटरिंग, राहणार - संगमनेर, जि. अहिल्यानगर; मूळ रा. तेजुर, ता. जुन्नर, जि. पुणे) यास स्टाफच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत आरोपीने प्राथमिक तपासात कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे कबूल केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशन करत आहे.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
ही तत्पर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा युनिट-३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोउपनि भरत गोसावी,.सुनिल जावळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सोनवणे, बोऱ्हाडे, भोसुरे, सुर्यवंशी, भांगले, राळे, दांगट, महाले, थोरात, वराडे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे प्रकाश ननावरे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
ही घटना आळंदी परिसरात खळबळ माजवणारी ठरली असून, पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करून स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षा भावना निर्माण केली आहे. पुढील तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.