राजगुरूनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे, उपाध्यक्षपदी अश्विनी पाचारणे बिनविरोध निवड
सागर पाटोळे यांना पहिल्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँकेपैकी एक असणाऱ्या राजगुरूनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे यांची, तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक पदाची सलग दोन पंचवार्षिक निवडणुका जिंकत सागर पाटोळे यांना पहिल्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी सचिन सरसमकर यांच्या देखरेखीखाली पार पडली.
जेष्ठ संचालक यांची मध्यस्ती यशस्वी आणि बिनविरोध निवड
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन अर्ज भरण्यात आले यामध्ये सागर पाटोळे व विजयाताई शिंदे यांनी अर्ज दाखल केले. जेष्ठ संचालक यांनी मध्यस्थी यशस्वी करत विजयाताई शिंदे यांनी अर्ज माघार घेतल्याने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. उपाध्यक्षपदासाठी अश्विनी पाचराणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणुकीत सागर पाटोळे आणि अश्विनी पाचारणे यांचे अर्ज बिनविरोध राहिल्याने त्यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी सचिन सरसमकर यांनी या प्रक्रियेचे काटेकोरपणे नियोजन केले, ज्यामुळे निवडणूक पारदर्शक आणि निर्विघ्नपणे पार पडली. बँकेच्या सभासदांनी या निवडीचे स्वागत केले असून, पाटोळे आणि पाचारणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
संचालक मंडळाची उपस्थिती
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष किरण आहेर, दिनेश ओसवाल, राहुल तांबे, विजया शिंदे, गणेश थिगळे, राजेंद्र सांडभोर, रामदास धनवटे, अविनाश कहाणे,अरुण थिगळे, विनायक घुमटकर, दत्ता भेगडे, राजेंद्र वाळुंज, समीर आहेर, सचिन मांजरे, विजय डोळस उपस्थित होते.
सागर पाटोळे यांचे नेतृत्व
सागर पाटोळे यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात बँकेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. २०१८-२२ ते २०२२-२७ पाटोळे हे सलग दोन पंचवार्षिक मध्ये संचालकपदी चांगल्या मतधिक्याने निवडून आले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी संभाळी आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर पाटोळे यांनी सभासदांचे व संचालक मंडळाचे आभार मानले आणि बँकेच्या सततच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
अश्विनी पाचारणे यांची भूमिका
उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अश्विनी पाचारणे यांनीही बँकेच्या कामकाजात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या सहभागामुळे बँकेच्या सामाजिक आणि आर्थिक उपक्रमांना गती मिळाली आहे. त्यांनी आपल्या निवडीनंतर बँकेच्या सभासदांना आणि सहकाऱ्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आणि भविष्यात बँकेच्या प्रगतीसाठी सागर पाटोळे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही दिली.