Shivaji Aadhalrao Vs Dilip Mohite | आढळराव पाटील यांनी घेतलेली भेट निष्फळ ; मोहिते पाटलांचा आढळरावनां विरोध कायम
Shirur Loksabha ; आमचे मतभेद व संघर्ष टोकाचा आहे ; पक्षाने आढळरावांना तिकीट दिले तर मी काम करणार नाही घरी बसेन
Shivaji Aadhalrao| Dilip mohite
राजगुरुनगर : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Aadhalrao Patil ) आणि माझे मतभेद हे राजकारणातले असून आमचा संघर्ष टोकाचा आहे.पक्ष नेतृत्वाने देखील मला विचारले नाही.लोकसभा निवडणुकीत जर पक्षाने आढळरावांना तिकीट दिले आणि त्यांचे काम करायची वेळ आली तर मी घरी बसेन.अशी रोखठोक भूमिका खेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार दिलीप मोहिते पाटील ( Dilip Mohite Patil ) यांनी घेतली आहे.
आढळराव आणि मोहिते पाटील यांचे राजकीय वैर खेड तालुक्यासह जिल्ह्याला सर्वश्रुत माहित आहे.आढळराव व मोहिते यांचे मनोमिलन होऊन कधीच आघाडी झाली नाही उलट कायम बिघाडीच होत राहिली.आढळरावांचा तालुक्यात विकासकामांना हस्तक्षेप यामुळे मोहिते त्रस्त आहेत.तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक न करता आल्याने झालेला पराभव मोहितेंच्या अजूनही जिव्हारी लागला आहे.मोहिते पाटील हे परखड बोलणारे आणि टीका करण्यात माहीर आहेत.दोन्ही नेत्यांनी जुळवून घेण्याचा कधीच प्रयत्न न केल्याने त्यांचा संघर्ष कायम वाढतच राहिला.महायुतीत शिरूर लोकसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने आढळरावांची पंचाईत झाली. आता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यापलीकडे त्यांना पर्याय उरला नाही.त्यामुळे आढळरावांनी मध्यतरी अजित पवारांची भेट घेतल्याने मोहितेंचा तीळपापड झाला आणि त्यांनी उघडपणे आढळरावांना विरोध दर्शवीला आहे.
नुकतीच शनिवारी रात्री (९ मार्च) आढळरावांनी थेट खेडला येऊन मोहिते पाटलांचे घर गाठून सदिच्छा भेट घेतली.पण रात्र उजाडते न उजाडताच मोहितेंनी लगेच युटर्न घेत आढळराव यांचे बरोबर काम करणार नसून तशी वेळ आली तर घरी बसेन अशी भूमिका स्पष्ट केली.यामुळे लोकसभा निवडणूक तोंडावर दोन्ही नेत्यात जुळणे मुश्किल असल्याची चर्चा सुरु आहे.
आपली भूमिका स्पष्ट आणि सडेतोडपणे सांगताना मोहिते पाटील म्हणाले की राजकारण हे खुन्नसने केले तर ते राजकारण राहत नाही.आढळराव यांनी माझ्यासोबत टोकाचे राजकारण केलं.माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आढळराव यांच्या सोबत नकोच अशीच आहे.राज्यात महायुती असूनही मला कुठेही विश्वासात घेतले नाही.तीन पक्ष एकत्र यायला पाहिजे तेवढे एकत्र आलो नाही एकत्र चर्चा झाल्या नाही.ज्यांचे पक्षाचे मंत्री ते फक्त त्याच पक्षाच्या नेत्यांना भेटतात.त्याचा त्रास आमच्या सारख्या आमदारांना होतोय.त्यामुळे माझी भूमिका ठाम विरोधाची आहे.
खेड तालुका हा निर्णायक राहिल्याने आढळराव व कोल्हेचे राजकीय जीवन या तालुक्याने घडविले.आढळराव आणि माझे टोकाचे मतभेद आहेत.ज्यांच्या बद्दल मी टोकाची भूमिका घेतली त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर मी शांत राहणार.दिलीप वळसे पाटील ( Dilip Valse Patil ) हे राजकारणातील भाग्यवान माणूस असून साहेबांनी त्यांच्या पदरात कायम सुख टाकलंय.त्यांच्या सुखासाठी वळसे पाटील हे काहीही करू शकतात.संघर्ष हा माझ्या जीवनात आहे तो आज ही आहे आणि उद्याही असेन.अजित पवार माझ्या दृष्टीने सर्वस्व असून मला विचारतील असे वाटत होते पण तो प्रयत्न झाला नाही.पक्ष बदलणारा कार्यकर्ता मी नाही.अशी भूमिका मोहितेंनी स्पष्ट केली.
