Shirur loksabha | खा. कोल्हेंचे टेन्शन वाढणार...?
शिरूर लोकसभेला मनोहर महादू वाडेकर या अपक्ष उमेदवार 'तुतारी' (ट्रम्पेट') हे चिन्ह देण्यात आले.
राजगुरुनगर | शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये मनोहर महादू वाडेकर या अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह देण्यात आले. अपक्ष उमेदवार वाडेकर यांना "तुतारी" चिन्ह दिल्यामुळे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढणार...?
पुणे आणि शिरूर मतदारसंघांमधील उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये शिरूरमधील अपक्ष उमेदवाराला "ट्रम्पेट' हे चिन्ह देण्यात आले. मात्र, त्याला कुणीही आक्षेप घेतला नाही. बारामती मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला हे चिन्ह दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला होता. 'ट्रम्पेट'चे मराठीत भाषांतर 'तुतारी' करण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे. मात्र, शिरूरमध्ये उपस्थित उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी 'ट्रम्पेट' हे चिन्ह अपक्षाला दिल्यानंतर आक्षेप घेतला नसल्याची माहिती शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी स्पष्ट केले.

