विद्यार्थिनींनी शारीरिक, बौध्दिक व मानसिक क्षमतांचा विकास करावा - स्नेहल गुरव
राजगुरू महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान संपन्न
राजगुरुनगर : विद्यार्थिनींनी कोणत्याही अन्याय, अत्याचार अथवा दबावाला बळी न पडता आपला शारीरिक, बौध्दिक व मानसिक क्षमतांचा विकास करून निर्भयपणे वाटचाल करण्याचे आवाहन खेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांनी केले. त्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित निर्भय कन्या अभियान कार्यक्रमात स्त्री हक्क - अधिकार विषयक नियम संहिता कायदे, महिला स्वसंरक्षण या विषयावर बोलत होत्या.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, कराटे प्रशिक्षिका काजल बोऱ्हाडे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संदीप थोरात आणि सर्व महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांनी आपल्या व्याख्यानात महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांविषयी माहिती दिली. विद्यार्थिनींनी स्वतःमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपल्या ज्ञानात वाढ करणे, सामाजिक अभ्यास, स्वतःमधील असलेल्या उणिवांची जाणीव व त्यावर काम करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींनी जीवनाची नीतिमूल्ये न विसरता आपल्या कुटुंबाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. निर्भया पथक, सायबर फ्रॉड, पोलीस दिदी आदि उपक्रमांसंदर्भात त्यांनी माहिती सांगितली.
काजल बोऱ्हाडे यांनी महिला स्वसंरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. कराटे प्रशिक्षणाबद्दल प्राथमिक माहिती सांगितली. या उपक्रमात २४० विद्यार्थीनी सहभागी झाल्या.
सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा लोणारी यांनी, प्रास्ताविक प्रा. संदीप थोरात यांनी तर आभार प्रा. नीता डोंगरे यांनी मानले.
