एपीएम टर्मिनल कंपनी कडून भांबोलीत ६५० नागरिकांचे लसीकरण - सरपंच भरत लांडगे

राजगुरूनगर - प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे जीवन सुरक्षित राहणार असल्याने नागरिकांनी लसीकरण करावे,असे आवाहन भांबोली ग्रामपंचायतीचे सरपंच भरत लांडगे यांनी केले.
भांबोली हद्दीतील एपीएम टर्मिनल कंपनीने ६५० कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध केल्याने भांबोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लसीकरण कॅम्प येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला.लसीकरण कॅम्पचे उदघाटन प्रसंगी सरपंच भरत लांडगे बोलत होते. यावेळी उपसरपंच स्वाती वाडेकर,देविदास राऊत,अंकुश कडाळे,कांताबाई निखाडे,नीता राऊत,ग्रामसेवक विकास विसे,खेड तालुका वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लांडगे,एपीएम कंपनीचे अधिकारी व लसीकरणासाठी आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.
भांबोली हे औद्योगिक क्षेत्रातील गाव असून कारखानदारीमुळे गावच्या परीसरात नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.कारखान्यातील अनेक कामगार हे परराज्यातील असल्याने त्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणे मुश्किल होते.लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन सरपंच यांनी कंपनीला केले होते.त्यानुसार कंपनीने ६५० लसीचे डोस उपलब्ध केल्याने गावच्या परिसरातील नागरिकांसह कंपनीच्या कामगारांनी देखील लसीचा पहिला तर काहींनी दुसरा डोस घेतला.गावात लस मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.