Corporation election Rajgurunagar : महायुतीत फूट, स्वबळावर लढत; थेट नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात
राजगुरूनगर शहरात महायुती पूर्णपणे संपुष्टात ; महाविकास आघाडी कायम
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेची निवडणूक जशी जवळ येत चालली तशी रंगतदार होताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजगुरूनगर शहरात महायुती पूर्णपणे संपुष्टात आली. यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत संघर्षमय आणि रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
अर्ज माघारीनंतर एकूण पाच उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी कायम केली. यामध्ये महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवार तर आहेतच,या शिवाय महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि एक अपक्ष उमेदवारही शडू ठोकून मैदानात उतरले आहेत. माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबरला संपल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे, सध्याच्या स्थितीत ही लढत अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य व राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष बापू थिगळे आणि शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक तथा उद्योजक मंगेश गुंडाळ तसेच भाजपाकडून माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे व अपक्ष म्हणून गणेशकुमार इंगवले यांच्यात थेट लढत होणार आहे.
विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरूनगरमध्ये शहर विकासाच्या हितासाठी “शहरविकास आघाडी” स्थापन करण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि वर्चस्वाच्या लढाईमुळे हे प्रयत्न अपयशी ठरले. विशेष म्हणजे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण आहेर यांना भाजपा, ठाकरे गटाकडूनही आमंत्रण होते,परंतु माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मोठी खेळी करून त्यांना राष्ट्रवादीत घेऊन थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. आहेर यांचे कार्यकर्ते यामुळे समाधानी आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, किरण आहेर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना काही प्रभागांमध्ये आपल्या विश्वासातील उमेदवारांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी, अशी स्पष्ट अट घातली होती. ही अट मान्य झाल्याने आहेर यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारी निश्चित झाली. यामुळे राजगुरूनगरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली जात आहेत.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष सागर सातकर यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पूर्वीपासून प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांनी अनेक समाजकार्य केलेले आहे.या प्रभागातून नगरसेवक पदासाठी ते प्रमुख इच्छुक होते.त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखलही केला होता. परंतु ऐनवेळी त्यांची राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी कापण्यात आली.ऐनवेळी पत्ता कट झाल्याने सागर सातकर यांनी निवडणूकीतून माघार घेतली.राजगुरूनगर शहरात सातकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
सागर सागर सातकर यांना आम्ही संपर्क केला असता त्यांनी " राष्ट्रवादी पक्ष व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जो निर्णय घेतला तो मान्य आहे.पुढील काळात मोहिते पाटील व पक्षाशी एकनिष्ठ राहूनच काम करणार "असल्याने त्यांनी सांगितले.
निवडणुकीत पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत असली तरी खरी चिखलफेक ही आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते अतुल देशमुख यांच्यात होणार हे स्पष्ट असून त्यांच्यातील राजकीय वैर हे मात्र प्रचारात एकमेकांवर वैयक्तिक टीका टिपण्णी आणि आरोप-प्रत्यारोपांचा मोठा भडका उडणार हे निश्चित आहे.
