Zp election | पाईट - आंबेठाण गटात चुरस ; बुट्टेपाटलांच्या विरोधात गोरे,गाळव,जैद आव्हान पेलणार ?

पाईट -आंबेठाण गटात चुरस वाढली  निशा गोरे,रत्नमाला गाळव,राजश्री जैद यापैकी कोण राहणार बुटे पाटील यांच्या विरोधात स्पर्धक ?

Zp election | पाईट - आंबेठाण गटात चुरस ;  बुट्टेपाटलांच्या विरोधात गोरे,गाळव,जैद आव्हान पेलणार ?

Khed | zp election pait-ambethan zp

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील पाईट - आंबेठाण या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक झाले आहेत.अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाली आहेत.अनेक नवनवीन नावांची समीकरणे बदलत चालली आहेत.त्यामध्ये माजी आमदार स्व.सुरेश गोरे यांचे बंधू उद्योजक राहुल गोरे यांच्या पत्नी निशा गोरे,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव यांच्या पत्नी पंचायत समिती व बाजार समितीच्या माजी सदस्या रत्नमाला गाळव, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांच्या मातोश्री राजश्री जैद याही निवडणूक लढविण्यासाठी मैदानात येण्याची चिन्हे आहेत.अनेकांच्या उमेदवारीने या गटातील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

यापूर्वीचा पाईट-पिंपरी बुद्रुक आणि आता नव्याने अस्तित्वात आलेला पाईट-आंबेठाण या जिल्हा परिषद गटाचे प्रस्थापित नेते शरद बुटे पाटील आहेत.सलग 20 वर्ष बुट्टे पाटील यांनी या गटाचे नेतृत्व केलेले आहे. झालेल्या आरक्षणात हा गट सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे.या गटातून शरद बुटे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील निवडणूक लढविणार आहेत. बुट्टे पाटील यांचे तगडे आव्हान पाहता त्यांना या निवडणुकीत नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.माजी आमदार स्व.सुरेश गोरे यांचे शेतकरी वर्गाशी अत्यंत निकटचे  जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसेच आमदार पदाच्या काळात गोरे यांनी या गटात काही कामे केले आहेत. तसेच जुने निष्ठावंत शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून राहुल गोरे यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या पत्नी निशा गोरे यांना या गटातून उमेदवारी मिळाल्यास बुटे पाटील यांना निवडणूक सोपी राहणार नाही.


माजी उपसभापती कैलास गाळव यांच्या पत्नी रत्नमाला गाळव याच गटातून पंचायत समितीला निवडून गेल्या होत्या.तर बाजार समितीच्या सदस्य देखील झालेल्या आहेत.कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.या गटात गाळव यांचे नातेगोते मोठे आहे.तसेच कायम बुट्टे पाटलांच्या विरोधात त्यांनी अनेक निवडणुका लढविलेल्या आहेत.त्यामुळे खरं पाहिलं तर बुट्टे पाटील यांचा खरा विरोधक गाळव हेच आहेत.बुटे पाटलांच्या विरोधात गाळव यांनी कायम संघर्ष केला पण त्यांना यश आले नाही.गाळव हे सुद्धा शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत.त्यांनी निवडणूक देखील सेनेच्या तिकिटावर लढवली होती.परंतु या वेळची निवडणूक थोडी वेगळी होणार आहे.मागच्या सारखे वातावरण सध्या राहिलेले नाही.त्यामुळे गाळव हेच बुटे पाटील यांना जबरदस्त टक्कर देऊ शकतात हे तितकेच सत्य आहे.

 

 

बाजार समितीचे संचालक व आमदार बाबाजी काळे यांचे भाचे अनुराग जैद यांच्या मातोश्री राजश्री जैद या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता असून त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने अनेक गावातील कार्यकर्त्यांशी संपर्क करून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.खड्डे पडलेल्या रस्त्यावर स्वखर्चाने मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी अशी कामे सुरू केली आहेत.जैद हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत.त्यामुळे जैद यांच्या उमेदवारीने होणारी  निवडणूक जोराची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

 

निवडणूक जाहीर होण्याच्या सुरुवातीच्या काळात माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी पत्नी कल्पना देशमुख यांच्यासाठी चाचपणी सुरू केली होती. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून कसलीच हालचाल दिसत नाही. बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे यांच्या पत्नीमाजी सरपंच प्राची लिंभोरे यांचा देखील निवडणूक लढविण्याचा आवाज आला होता परंतु अध्याप तरी त्यांच्या हालचाली दिसत नाहीत.तसेच वारकरी संप्रदायातील भूषण प्रसिद्ध कीर्तनकार हभप सुप्रिया साठे-ठाकूर यांना मानणारा वर्ग या गटात मोठ्या प्रमाणात असल्याने या देखील ऐनवेळी उमेदवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

पाईट- आंबेठाण या गटातील निवडणुकीचे सध्याचे  वातावरण पाहता एकंदरीत निशा गोरे,रत्नमाला गाळव व राजश्री जैद हे तीन उमेदवार सध्या तरी निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात येण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. माजी आमदार स्व.सुरेश गोरे यांचे पाईट आंबेठाण या गटातील गावांमध्ये व्यवसायाच्या दृष्टीने शेतकऱ्यांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.राहुल गोरे यांचा चांगला मित्रपरिवार या गटात पसरलेला आहे.शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ता म्हणून राहुल गोरे यांच्याकडे पाहिले जात आहे. राहुल गोरे यांच्या पत्नीच्या उमेदवारीने बुट्टे पाटील यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.