Khed | देवाची टीका भोवली! खंडोबाचा कोप की जनतेचा रोष? माजी आमदारांच्या नियोजनाचे 'पिंपळगाव' गटात धिंडवडे
खेड-मरकळमध्ये राष्ट्रवादीचा ४० वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त; 'विजय शिंदे 'चा झंझावात अन् जिल्ह्यात 'शिंदे पॅटर्न'चीच चर्चा!
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खेड-मरकळ जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार आणि माजी सभापती विजय शिंदे यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. प्रस्थापितांच्या राजकारणाला मतदारांनी दिलेली ही जोरदार चपराक असून, या विजयाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात 'शिंदे पॅटर्न' ची चर्चा सुरू झाली आहे.
बाजार समितीनंतर आता जिल्हा परिषदेतही 'शिंदे पॅटर्न'चा डंका
तालुक्यात अमर शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली 'शिंदे पॅटर्न'ने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अत्यंत नियोजनबद्ध यश मिळवून सभापती पद खेचून आणणारा 'शिंदे पॅटर्न' आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही गेमचेंजर ठरला आहे. स्वतःचे गाव या मतदारसंघात नसतानाही विजय शिंदेनी मिळवलेला हा विजय म्हणजे अमर शिंदे यांच्या रणनीतीचा आणि नियोजनाचा विजय मानला जात आहे.
बड्या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का
या गटाचे नेतृत्व आतापर्यंत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि.प. सदस्य सुरेखा मोहिते पाटील आणि माजी जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी केले होते. मात्र, यंदा मतदारांनी परिवर्तनाला साथ दिली. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे निवडणुकीचे सर्व नियोजन विजय शिंदेच्या झंझावातापुढे सपशेल अपयशी ठरले आहे.
'खंडोबा'वरील टीका आणि छुपी युती भोवली
प्रचारादरम्यान खंडोबा देवस्थानबाबत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केलेली टीका त्यांना चांगलीच महागात पडल्याचे निकालातून स्पष्ट झाले. मतदानानंतर अनेक बूथवर राष्ट्रवादीला केवळ दोन अंकी मते मिळाली, जे यापूर्वी कधीही घडले नव्हते. तसेच, मतदानाच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेली 'अदृश्य साथ' मतदारांनी धुडकावून लावली. धनुष्यबाण उमेदवाराचा 'भावनिक प्रचार' मतदारांच्या पचणी पडला नाही.
पंचायत समितीतही 'शिंदे पॅटर्न'चा गुलाल
विजय शिंदे यांच्यासोबतच त्यांच्या पॅनेलचे दोन्ही पंचायत समिती उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. राजकारणात नवखे असूनही पिंपळगावच्या माजी सरपंच विद्या मोहिते आणि मरकळचे शेतकरी नेते प्रसाद घेनंद यांनी मिळवलेला विजय हा 'शिंदे पॅटर्न'च्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे.
नव्या पर्वाची सुरुवात
"हा विजय माझा नसून विकासावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे," अशी भावना विजय शिंदे यांनी व्यक्त केली. बाजार समितीपासून सुरू झालेला 'शिंदे पॅटर्न' आता जिल्हा परिषदेतही यशस्वी झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या निकालामुळे खेड तालुक्यात शिवसेनेचा (ठाकरे गट) भगवा अधिक गडद झाला असून संपूर्ण जिल्ह्यात या विजयाची जोरदार चर्चा रंगली आहे.
