Khed | शिवे-वाकीतर्फे वाडा सयुक्त ग्रामपंचायत सरपंचपदी निर्मलाताई कोळेकर
चिठ्ठीद्वारे सरपंचपदी निर्मला मारुती कोळेकर यांची निवड
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्याच्या राजकीय पटलावरील महत्वाच्या काही मोजक्या ग्रामपंचायतीपैकी शिवे-वाकी तर्फे वाडा ही संयुक्त ग्रामपंचायत आहे. राजकीयदृष्ट्या या ग्रामपंचायतीला तालुक्यात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलेआहे.नुकतीच शिवे-वाकी तर्फे वाडा या संयुक्त ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक झाली. निवडणुकीत निर्मला मारुती कोळेकर आणि दिपाली लहू कोळेकर यांना समसमान चार चार मते पडली असता चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. चिठ्ठीद्वारे सरपंचपदी निर्मला मारुती कोळेकर यांची निवड झाली.
शिवे-वाकी तर्फे वाडा संयुक्त ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ आहे.परंतु एक सदस्य अपात्र ठरल्याने ग्रामपंचायतीचे आठ सदस्य आहेत. अन्य सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळावी म्हणून ठरल्याप्रमाणे मुदतीत कविता शिवेकर यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त सरपंचपदाची निवडणूक (दि.६) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.सरपंचपदासाठी निर्मला कोळेकर व दिपाली कोळेकर यांचे अर्ज आले होते. कोणीही माघार न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. दोन्ही उमेदवारांना समसमान चार चार मते पडली असता चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला.चिठ्ठीद्वारे निर्मला मारुती कोळेकर यांची सरपंचपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करंजविहिरे मंडल अधिकारी राजेंद्र वढणे यांनी काम पाहिले.त्यांना ग्रामपंचायत अधिकारी उल्हास कोरडे यांनी कामात मदत केली.
निवडणूक प्रसंगी सभागृहात नवनिर्वाचित सरपंच निर्मला कोळेकर,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अक्षय शिवेकर,ज्ञानेश्वर शिवेकर,कविता शिवेकर, उपसरपंच आनंद साकोरे,ग्रामपंचायत सदस्य मनीषा शिवेकर,विनायक शिवेकर उपस्थित होते.निवडणूक प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव शिवेकर यांचेसह ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक उपस्थित होते.
निर्मला कोळेकर यांनी यापूर्वी उपसरपंच म्हणून काम केले होते.त्यानंतर त्यांची सरपंचपदी निवड झाली आहे.त्यांचे पती मारुती कोळेकर हे शरद बुट्टे पाटील मित्र मंडळ मुंबईचे अध्यक्ष आहेत.निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.निवडणूक प्रसंगी पोलीस बंदोबस्त होता.
