Chakan | २ ऑक्टोबरनंतर आमचा लढा गांधी मार्गाने राहणार नाही - माजी मंत्री बच्चू कडू

आंबेठाण येथे शेतकरी हक्क परिषद : बच्चू कडू यांचा इशारा ; गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत आम्ही गांधी मार्गाने आंदोलन केले, परंतु २ ऑक्टोबरनंतर आंदोलन तीव्र होणार

Chakan | २ ऑक्टोबरनंतर आमचा लढा गांधी मार्गाने राहणार नाही - माजी मंत्री बच्चू कडू

 

महावार्ता लाईव्ह | शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. "आमचा लढा हा केवळ मतांसाठी नसून, सर्वसामान्य लोकांच्या वेदना थांबवण्यासाठी आहे. गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आतापर्यंत आम्ही गांधी मार्गाने आंदोलन केले, परंतु २ ऑक्टोबरनंतर आमचा लढा गांधी मार्गाने राहणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी आंबेठाण (ता. खेड) येथील शेतकरी हक्क परिषदेत दिला.

 

पहिली शेतकरी हक्क परिषद संपन्न


शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यापूर्वी अन्नत्याग आंदोलन, पदयात्रा, चक्काजाम आंदोलन असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. याच मालिकेतील पहिली शेतकरी हक्क परिषद आज आंबेठाण येथे आयोजित करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली आणि सरकारला जागे करण्यासाठी पुढील काळात पाच शेतकरी हक्क परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेला प्रदेश संघटनेचे संस्थापक सदस्य शामराव पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष नंदकिशोर लोखंडे, शरद जोशी विचार मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, मृण्मय काळे, संतोष मांडेकर, शांताराम चव्हाण, अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे, गीताबाई मांडेकर, राजश्री गायकवाड, कांचन मांडेकर, बाजीराव लोखंडे, गजानन गांडेकर, दशरथ काचोळे, महेंद्र नाईकनवरे यांच्यासह अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

​​​​या परिषदेत शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:  


▪️संपूर्ण कर्जमुक्ती : शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळावी.  
▪️ किमान हमीभाव : सर्व प्रकारच्या शेतमालाला किमान हमीभाव मिळावा.  
▪️दूध दर : गायीच्या दुधाला प्रति लिटर ४८ रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ५८ रुपये दर मिळावा.  
▪️ऊस दर : २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी उसाला प्रति टन ४,४०० रुपये दर मिळावा.  
▪️कांदा दर : कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल किमान २,५०० रुपये दर मिळावा.  
▪️पेन्शन आणि सुविधा : दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन आणि मोफत घरे, तसेच ५५ वर्षांवरील शेतकऱ्यांना किमान १०,००० रुपये पेन्शन मिळावी.  
▪️मेंढपाळ आणि मच्छीमारांना संरक्षण : मेंढपाळ आणि मच्छीमारांना संरक्षण मिळावे, तसेच बेरोजगार युवकांना नोकऱ्या मिळाव्यात.  
▪️उसाच्या थकीत रकमेवर व्याज : शेतकऱ्यांच्या थकीत उसाच्या एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशानुसार १५ टक्के व्याजाची भरपाई हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळावी.

 

शरद जोशी यांच्या स्मारकाची खंत 


यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या आंबेठाण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला नमन केले. मात्र, त्यांच्या राहत्या घराची आणि परिसराची दुरवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. "सरकारपेक्षा आमची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवसही या स्मृतीस्थळी जाऊन श्रमदान करावे वाटत नाही, ही शरमेची बाब आहे," असे ते म्हणाले. पुढील काळात सर्वांना एकत्रित आणून शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

आंदोलनाची पुढील दिशा 


बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. "२ ऑक्टोबरनंतर आम्ही गांधी मार्ग सोडून अधिक आक्रमक पवित्रा घेऊ," असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुढील चार हक्क परिषदा आणि व्यापक जनआंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी हा लढा अखंड सुरू राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

 

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद 


आंबेठाण येथील या परिषदेने शेतकऱ्यांच्या मागण्यांना पुन्हा एकदा बळ दिले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक संकटे आणि सरकारच्या अनास्थेपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शेतकरी समाजाने एकजुटीने या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.