राज्यस्तरीय " जीवनगौरव " पुरस्काराने शरद बुट्टेपाटील यांचा सन्मान
राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंचायतराज क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय 'जीवनगौरव पुरस्कार' पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांना प्रदान करण्यात आला.केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष,कैलास गोरे,प्रमोद काकडे,उदय बने,पांडुरंग पवार,सुभाष घरत,राम जगदाळे, वीरधवल जगदाळे यांचेसह राज्यातील जिल्हा परिषदेचे अनेक अध्यक्ष,विषय समित्यांचे सभापती,सदस्य आदी उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील यांनी तीन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रभावी काम करत असतानाच यशदा या राज्य प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या प्रशिक्षणात व्याख्याते म्हणून महत्वाचे काम केले आहे. तसेच त्यांनी राज्यभरातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सरपंच संसद मध्ये जाऊन लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण दिले आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, राज्यस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यात देखील त्यांची व्याख्याने झाली आहेत. केरळ येथे झालेल्या ७३ व्या घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
राज्यभरात होणाऱ्या पंचायत क्षेत्रातील विविध कार्यक्रमांना यांचे मार्गदर्शन लाभले असून यापूर्वी त्यांचे सक्षम लोकप्रतिनिधी सर्वागीण ग्रामविकास चे पुस्तक तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. तर आता पुणे जिल्हा परिषदेतील सभागृह कामकाजाबद्दल चे त्यांचे जिल्हा परिषद क्षमता आणि उणिवा हे पुस्तक कपिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्याने संस्थेचे हितासाठी त्यांनी राज्य आणि केंद्र पातळीवर विविध प्रयत्न केले असून अनेक विषय मार्गी लावण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे.
राज्यातील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षित करून जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी शरद बुट्टे पाटील यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनने पंचायतराज क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------
