Zp Election | लक्ष्मी दर्शनाने खेडमध्ये मतदारांची चंगळ ; प्रचार संपला, उद्या मतदान
खेडमध्ये ८ जि.प. आणि १६ पं.स. जागांसाठी तगडा सामना
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक प्रचार थंडावला. लक्ष्मी दर्शनासह भेटवस्तू यामुळे मतदारांची चंगळ झाली.जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी शनिवारी (दि.७) रोजी मतदान होत असून निवडणुक निकाल सोमवारी (दि.९) रोजी लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे गट) असा तिरंगी सामना पाहायला मिळाला.
प्रचाराचा जोरदार शेवट
प्रचाराच्या शेवटच्या दिवसात उमेदवारांनी पदयात्रा, सभा,मोटार रॅली आणि घरफेरीद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधला. प्रचार संपण्यापूर्वी अनेक ठिकाणी कोपरा सभांचे जोरदार आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी पाहायला मिळाली.या दोन पक्षांमध्ये तगडा सामना रंगला असून शिवसेना शिंदेगटाने देखील वातावरण तापविले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार व पक्षाचे नेत्यांनी झालेल्या कोपरा सभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
या निवडणुकीत प्रचारादरम्यान शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील जुना नवा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला.दोघांमधील वैचारिक आणि वैयक्तिक मतभेदांमुळे मतदारांमध्येही ध्रुवीकरण झाल्याचे चित्र आहे.
मतदारांना 'लक्ष्मी दर्शनाचा लाभ
निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीदर्शन, साड्या वाटप, चांदीची नाणी, सोन्याच्या नथा आणि इतर भेटवस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला.अनेक गटांमध्ये मतदारांना 'लक्ष्मी दर्शन' म्हणजे रोख रक्कम देण्याची प्रथा पुन्हा एकदा दिसून आली.तसेच जेवणावळी व ढाबापार्टी यामुळे मतदारांची चांगलीच चंगळ झाली आहे.
प्रमुख गट व लक्ष्मी दर्शन
कुरुळी-आळंदी ग्रामीण, नाणेकरवाडी-महाळुंगे, काळूस -मेदनकरवाडी, पिंपळगाव-मरकळ, वाफगाव-रेटवडी, पाईट-आंबेठाण, चास-कडूस या गटात मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा लाभ झाला. वाडा-वाशेरे या गटात प्रचारावर भर देण्यात आला. वरील तीन गटात सर्वात 'लक्ष्मी दर्शना'मुळे मतदारांचा भाव वाढवण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला असून,काही ठिकाणी हे प्रमाण इतके वाढले की ते चर्चेचा विषय ठरले.
निवडणुकीचे महत्त्व
खेड तालुक्यातील ही निवडणूक स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यांसह राजकीय वर्चस्वाची लढाई ठरली आहे. मतदानानंतर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.मतदानाच्या दिवशी शांततापूर्ण वातावरण राहावे यासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन प्रशासन व सर्व राजकीय पक्षांकडून करण्यात आलेले आहे. मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.
