Khed | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीमा नदीत आत्महत्येचा प्रयत्न, शोधासाठी एनडीआरएफची मोहीम सुरू

तीन दिवसांपासून बेपत्ता असून, एनडीआरएफच्या दोन पथकांकडून तिचा शोध सुरू

Khed | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीमा नदीत आत्महत्येचा प्रयत्न, शोधासाठी एनडीआरएफची मोहीम सुरू

 

महावार्ता लाईव्ह : खेड तालुक्यातील चांडोली गावात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. केटरिंगच्या कामासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर आचारी नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मानसिक त्रासामुळे पीडित मुलीने स्वतःला भीमा नदीत झोकून दिल्याचा संशय आहे. ती गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असून, एनडीआरएफच्या दोन पथकांकडून तिचा शोध सुरू आहे.

 

अत्याचारानंतर बेपत्ता, आत्महत्येचा संशय

​​​सदर अल्पवयीन मुलगी केटरिंग व्यवसायात काम करत होती. लग्न समारंभासाठी जेवण बनवण्याच्या कामावर गेल्यानंतर तेथील आचारीने तिच्यावर जबरदस्ती केली. घरी परतल्यानंतर तिने हा सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान राजगुरुनगर-चांडोली परिसरातील केदारेश्वर बंधाऱ्याजवळ मुलीची ओढणी व चप्पल आढळून आली. यामुळे तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप तिचा मृतदेह सापडलेला नाही.


 

एनडीआरएफचा शोध मोहीम सुरू, अडथळ्यांचे सावट

भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरलेली असून, सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह गढूळ आहे. यामुळे शोध मोहिमेत मोठे अडथळे येत आहेत. सुरुवातीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला गेला; मात्र काहीच हाती लागले नाही.

शुक्रवारी (दि. २३ मे) एनडीआरएफच्या दोन पथकांकडून केदारेश्वर बंधाऱ्यावर शोध मोहीम सुरू करण्यात आली असून, मुलीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

 

आरोपीला अटक, पोलीस तपास सुरूच

राजगुरुनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आचारी नराधमाला अटक करण्यात आली आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, कारण पीडितेचा तपास अद्याप सुरू आहे.

 

कुटुंबीयांमध्ये चिंता, पोलिसांवर प्रश्नचिन्ह

घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी मुलगी सापडलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता आणि अस्वस्थता आहे. मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडून जलद आणि प्रभावी तपासाची मागणी केली आहे.