कोरेगाव खुर्द येथील घटना : शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
चार दिवसापूर्वी आंबेठाण येथे तीन लहान भावंडांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. आज कोरेगाव खुर्द येथे शोषखड्ड्यात पडून एक चिमुकलीचा मृत्यू झाला.
१६ जुलै २०२२
राजगुरूनगर : कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथील घराजवळील मलनिस्सारनासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षांच्या गाथा नितीन कडूसकर या चिमुकली मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कडूसकर दांपत्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या कडूसकर कुटुंबाने घराच्या उत्तर बाजूला संडास बांधकाम करण्यासाठी शोषखड्डा खोदला होता. मागील काही दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरू असल्याने परिणामी या खड्ड्यात पाणी साचले होते. पावसामुळे बांधकामही बंद ठेवण्यात आले होते.
घरात ही मुलगी कागदाबरोबर खेळत होती.खेळता खेळता ही चिमुकली खड्ड्याजवळ गेली आणि पाण्यात पडली. बराच वेळ दिसली नाही म्हणून शोध घेतला असता खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ती खेळत असलेला कागद पाण्यावर तरंगताना दिसला त्यावरून पाण्यात मुलगी असल्याचा अंदाज येऊन शोध घेतला असता ती पाण्यात मृतावस्थेत आढळून आली.
