Khed Crime | कडुस येथे कोयत्याने वार करत भर रस्त्यात खून

दोन आरोपींविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Khed Crime | कडुस येथे कोयत्याने वार करत भर रस्त्यात खून

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील कडुस गावात (३ जून) रात्रीच्या सुमारास खुनाची धक्कादायक घटना घडली. चेतन बार समोर भर रस्त्यात कोयत्याने केलेल्या भयंकर हल्ल्यात संतोष बबन ढमाले (वय ४०, रा. कडुस) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कडुस परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणय प्रमोद नवले या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

फिर्यादी अशोक झांबर गारगोटे (वय ५०, रा. कारामळी, ता. खेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संतोष ढमाले हे त्यांचे मित्र असून ते दोघे चेतन बारमधून दारू पिऊन बाहेर येत असताना चेतन बारसमोर आरोपी किरण खंडागळे आणि प्रणय नवले उभे होते. संतोष ढमाले हे प्रणय नवले याच्याशी बोलण्यासाठी गेले असता, जुन्या वादामुळे वाद निर्माण झाला. प्रणय नवले याने पूर्वी संतोष ढमाले यांच्या मुलीची छेड काढल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी लपवून आणलेला कोयता काढून संतोष ढमाले यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर सपासप वार केले. या भयंकर हल्ल्यानंतर संतोष जमिनीवर कोसळला. दरम्यान, प्रणय नवले याने फिर्यादी अशोक गारगोटे यांना धमकावल्यामुळे ते घटनास्थळावरून पळाले आणि ढमाले यांच्या नातेवाइकांना घेऊन पुन्हा घटनास्थळी परतले. संतोष ढमाले हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. त्यांना तत्काळ युनिकेअर हॉस्पिटल, चाकण येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

या खुनाच्या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गरड करत आहे.