Khed | आसखेड खुर्द व निघोजे सोसायट्या पुणे जिल्ह्यात प्रथम संगनिकृत

Khed | आसखेड खुर्द व निघोजे सोसायट्या पुणे जिल्ह्यात प्रथम संगनिकृत

राजगुरुनगर : सहकार क्षेत्रात सुद्धा डिजिटल क्रांती आल्याने पुणे जिल्ह्यात प्रथम खेड तालुक्यातील आसखेड खुर्द आणि निघोजे या दोन विकास सोसायट्या संपूर्ण संगनिकृत झाल्या आहेत.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोसायट्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

केंद्र शासनाकडे सहकार खाते आल्याने या खात्याचे मंत्री अमित शहा आहेत.सहकार मंत्री शहा यांनी देशातील सर्व विकास सोसायट्यांचे संगनिकरण करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. सोसायट्यांचे संगनिकरण करण्यासाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञान असलेले सॉफ्टवेअर दिले आहे.दिलेल्या नवीन सॉफ्टवेअर मध्ये तालुक्यातील आसखेड खुर्द विकास सोसायटीने आपले सभासद शेतकरी आणि त्यांचे जमीन क्षेत्र,बँक खाते,सभासद शेतकऱ्याला क्षेत्रानुसार किती कर्ज मंजूर,कर्जाची परत फेड कधी केली.आदी माहिती समाविष्ट केल्याने एका क्लिक मध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती मिळत आहे.नवीन सॉफ्टवेअर यामुळे इथून पुढे विकास सोसायट्यांचा कारभार पारदर्शी राहणार आहे.

 

आसखेड खुर्द विकास सोसायटी संगनिकृत झाल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उप व्यवस्थापक विजय शिवले, बँकेचे विकास अधिकारी सचिन खेडकर,विभागीय अधिकारी तान्हाजी दौंडकर,चाकण बँकेचे शाखाधिकारी राहुल वाघमारे व केंद्र शासन सॉफ्टवेअर अधिकारी सुनील पांडे यांचे हस्ते सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब ऊर्फ पंढरीनाथ लिंभोरे पाटील यांचेकडे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे संगनिकरण मोठ्या प्रयत्नाने केल्याबद्दल सोसायटी सचिव चंदन पानसरे यांचा देखील सत्कार झाला.जिल्ह्यातील सर्व विकास सोसायट्या लवकरच संगनिकृत होतील असे बँकेचे उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.