Pune ZP News | पुणे जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. दिपक थिगळे यांची निवड
दिवाणी, जिल्हा व सत्र आणि महसूल न्यायालयात मांडणार जिल्हा परिषदेची बाजू ; स्थायी समितीच्या मान्यतेने अधिकृत आदेश जारी
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा परिषदेच्या कायदेविषयक सल्लागार पॅनलवर विधी तज्ज्ञ म्हणून ॲड. दिपक रामदास थिगळे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. दिवाणी न्यायालय, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय आणि महसूल न्यायालय (पुणे) येथील जिल्हा परिषदेच्या न्यायालयीन कामकाजासाठी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.से.) आणि जिल्हा परिषद सदस्या सुनिता शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते ॲड. दिपक थिगळे यांना या निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेच्या विरोधात किंवा वतीने विविध न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या दाव्यांमध्ये जिल्हा परिषदेची बाजू भक्कमपणे आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी हुशार व अनुभवी वकिलांची पॅनलवर नेमणूक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. यानुसार स्थायी समितीच्या सभेत या निवडीला सर्वानुमते मान्यता देण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाच्या (विधी कक्ष) वतीने याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
या नियुक्तीनुसार, ॲड. दिपक थिगळे हे दिवाणी, जिल्हा सत्र आणि महसूल न्यायालयातील प्रकरणांमध्ये पुणे जिल्हा परिषदेला कायदेशीर सल्ला देणे, प्रशासकीय व सेवाविषयक बाबी तसेच महसूल प्रकरणांमध्ये जिल्हा परिषदेच्या हिताचे रक्षण करत न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
ॲड. दिपक थिगळे यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि ग्रामस्थांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.