Palu Vikas Society Election | पाळू विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी रामदास सावंत; उपाध्यक्षपदी किसन केदारी यांची बिनविरोध निवड

पाईट विकास सोसायटीतून विभक्त होऊन पाळूची स्वतंत्र सोसायटी स्थापन; पहिल्याच निवडीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध.

Palu Vikas Society Election | पाळू विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी रामदास सावंत; उपाध्यक्षपदी किसन केदारी यांची बिनविरोध निवड

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील पाळू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रथम अध्यक्षपदी रामदास सावंत, तर उपाध्यक्षपदी किसन केदारी यांची बिनविरोध निवड झाली. नव्याने स्थापन झालेल्या सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला.


पाईट सोसायटीतून विभक्त होऊन पाळूची स्वतंत्र सोसायटी

यापूर्वी पाळू हे गाव पाईट विकास सोसायटीमध्ये समाविष्ट होते. पाळू महसुली गाव असल्याने पाईट सोसायटीमधून विभक्त होऊन त्यांनी स्वतंत्र पाळू विकास सोसायटीची मान्यता मिळविली. स्वतंत्र सोसायटी करण्यासाठी पाळू गावचे कार्यकर्ते व पाईट सोसायटीचे माजी अध्यक्ष रामदास सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह एकत्रित प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विभागाकडून सोसायटीला मान्यता मिळाली आहे. पाळू गावची स्वतंत्र सोसायटी झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

 

रामदास सावंत, किसन केदारी यांची बिनविरोध निवड

नुकतीच पाळू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पहिली मिटिंग खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात पार पडली. यामध्ये सोसायटीचे संस्थापक असलेले रामदास सावंत यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी किसन केदारी यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

 

निवडणुकीप्रसंगी पाईट येथील पाळू सोसायटीच्या सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास सावंत, उपाध्यक्ष किसन केदारी यांच्यासह नवनिर्वाचित संचालक सुधाकर केदारी, संभाजी आंद्रे, शंकर सावंत, कैलास केदारी, माऊली चव्हाण, शिवाजी केदारी, दत्तात्रेय सावंत, भीमराव गायकवाड, ज्योती सावंत, शांताबाई गुरव, तर तज्ज्ञ संचालक म्हणून शांताराम सावंत व गणेश भोर उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी वेळेत कर्जपुरवठा करणार

पाईट सोसायटीमधून विभक्त होऊन पाळू विकास सोसायटी स्थापन झाली आहे. सोसायटीच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी वेळेत पीडीसीसी बँकेकडून व सोसायटीच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जाईल. घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी वेळेत भरल्यास त्या शेतकऱ्याला तात्काळ कर्जपुरवठा होणार आहे, असे अध्यक्ष रामदास सावंत यांनी निवडीप्रसंगी बोलताना सांगितले.