Manohar Gorgalle Appointed | हिरवाई पर्यावरण संघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी मनोहर गोरगल्ले यांची नियुक्ती
राज्यभर पर्यावरण संवर्धन चळवळ विस्तारण्याचा निर्धार; प्रदूषणाविरोधातील लढ्याला मिळणार नवी दिशा
महावार्ता लाईव्ह | पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या हिरवाई पर्यावरण संघ आणि पर्यावरण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी निमगाव (ता. खेड, जि. पुणे) येथील मनोहर गोरगल्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार जेठे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.
पर्यावरणाचा वाढता ऱ्हास, औद्योगिक प्रदूषण, वृक्षतोड, जलस्रोतांचे प्रदूषण आणि नैसर्गिक संपत्तीची होणारी हानी याविरोधात हिरवाई पर्यावरण संघ सातत्याने काम करीत आहे. वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणविषयक जनजागृतीबरोबरच विविध प्रश्नांवर प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाते.
नवनियुक्त कार्याध्यक्ष मनोहर गोरगल्ले यांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांना पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीत सहभागी करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
पर्यावरणाच्या नावाखाली केवळ दिखावा न करता प्रत्यक्ष कृती करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांनी पर्यावरणविषयक नियमांचे पालन करावे, तसेच पर्यावरणपूरक औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.
ही नियुक्ती केवळ पदापुरती मर्यादित नसून निसर्ग, समाज आणि भावी पिढ्यांच्या भवितव्याच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. सोपविलेली जबाबदारी निष्ठेने, पारदर्शकपणे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता पार पाडावी, अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार जेठे यांनी व्यक्त केली.
'पर्यावरण वाचवा – भविष्य वाचवा' हा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी हिरवाई पर्यावरण संघ आगामी काळात अधिक व्यापक स्तरावर कार्यरत राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.