Savardari Supports Divyangs | सावरदरी ग्रामपंचायतीकडून १० दिव्यांगांना ९ लाख ४६ हजारांचा निधी वाटप; दिवाळी झाली गोड
स्मार्टग्राम पुरस्कारप्राप्त सावरदरी ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रम; प्रत्येकी ९४ हजार ६३१ रुपयांचे धनादेश वितरित.
महावार्ता लाईव्ह | महाराष्ट्र शासनाचा "स्मार्टग्राम पुरस्कार" मिळविलेल्या खेडच्या एमआयडीसी क्षेत्रातील सावरदरी ग्रामपंचायतीने कार्यक्षेत्रातील १० दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ९ लाख ४६ हजार ३१७ रुपयांचे वाटप केल्याची माहिती सावरदरी गावचे प्रशासक सरपंच संदीप बाळासाहेब पवार यांनी दिली. दहा दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ९४ हजार ६३१ रुपयांचा धनादेश महाळुंगे पंचायत समिती मतदारसंघाच्या सदस्या अश्विनी सोमनाथशेठ तरस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आला. दिवाळीच्या सणात धनादेश मिळाल्याने सावरदरी गावातील दिव्यांगांची दिवाळी गोड झाली.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावरदरी ग्रामपंचायत दरवर्षी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या निधीतील पाच टक्के राखीव निधी वाटप करते. दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होते. दिव्यांगांचे सक्षमीकरण व्हावे आणि हा दुर्लक्षित घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत निधीतील ५ टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवला आहे. दरवर्षी निधी मिळत असल्याने अनेक दिव्यांगांचे जीवनमान उंचावले आहे.

सावरदरी ग्रामपंचायतीने आपली सामाजिक बांधिलकी जपत आपल्या एकूण निधीच्या ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी राखीव ठेवून १० दिव्यांगांना एकूण ९ लाख ४६ हजार ३१७ रुपयांचे वाटप केले आहे. दिव्यांगांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ऐन दिवाळीत त्यांना धनादेश वाटप व्हावे यासाठी प्रशासक सरपंच संदीप पवार यांनी विशेष प्रयत्न केले.
दिव्यांगांना धनादेशाचे वाटप प्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या अश्विनी सोमनाथ तरस, प्रशासक सरपंच संदीप बाळासाहेब पवार, प्रशासक तुषार अरविंद साळंके, ग्रामपंचायत अधिकारी देविदास आजिनाथ आतार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण केले.
ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचे वितरण धनादेशाद्वारे करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. महाळुंगे गणातील सर्वच ग्रामपंचायतींनी दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी वितरित केल्याने त्यांच्या जीवनात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना फायदा होणार आहे. अश्विनी सोमनाथ तरस – सदस्या, पंचायत समिती
सावरदरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. नागरिकांना दररोज उच्च दाबाने पाणी आणि कचरा व्यवस्थापन यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रस्ते सुविधा, लाईट सुविधा, आरोग्य सुविधा, ड्रेनेज लाईन सुविधेसह अनेक सुविधा अधिक वेगाने निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या प्रयत्नाने करीत आहे. संदीप पवार – प्रशासक सरपंच, सावरदरी