पुणे जिल्ह्यातील साडेसहा हजार जनावरांना लम्पीची लागण
पुणे : जिल्ह्यामध्ये लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी सध्या सक्रिय जनावरांची संख्या ५६४ एवढी आहे. तर आत्तापर्यंत २७० जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एकूण बाधित जनावरांची संख्या ही ६ हजार ५५४ एवढी झाली आहे.
ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने इतर जिल्ह्यातून येणार्या जनावरांची संख्यादेखील ग्रामीण भागात वाढली आहे. साखर कारखान्यांवर असलेल्या जनावरांसाठी कारखाना प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे देखील आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेकडून कारखान्यांवरील जनावरांचे देखील लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली. डॉ. विधाटे म्हणाले, लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी सुट्टी न घेता काम करत आहेत, त्याला सध्या यश मिळताना दिसत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसत असून, इंदापूर, खेड आणि बारामती तालुक्यात बाधा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील बारामती आणि इंदापूरमध्ये अधिक आहे. सध्या ५६४ जनावरांवर उपचार सुरू असून, त्यापैकी ५६ जनावरे ही गंभीर आहेत.
