Deputy CM Sunetra Pawar | राजगुरुनगर बस स्थानकालगत नवीन पोलीस चौकी ; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन!

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश; राजगुरुनगरमध्ये नवीन पोलीस चौकी!

Deputy CM Sunetra Pawar | राजगुरुनगर बस स्थानकालगत नवीन पोलीस चौकी ; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन!

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरुनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे ऑनलाईन उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ४) रोजी संपन्न झाले.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी पोलीस चौकीचे ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर पोलीस चौकीच्या कोनशिलेचे अनावरण व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगरसेवक वैभव घुमटकर, दिनेश सांडभोर पाटील, मित्रसेन डोंगरे, सागर सातकर, अमित घुमटकर, राक्षेवाडीचे माजी उपसरपंच मच्छिंद्रशेठ राक्षे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन दाणे, कॉन्ट्रॅक्टर सुभाषशेठ होले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिनकर होले, पप्पू बनसोडे आदी उपस्थित होते.

 

 

राजगुरुनगर येथील बस स्थानक आणि जुन्या पुणे-नाशिक महामार्गालगत ही पोलीस चौकी उभारण्यात आली. यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पोलीस चौकीचे बांधकाम झाले आहे. बस स्थानक परिसरालगत चौकी बांधल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल. पोलीस चौकीचे बांधकाम पूर्ण झाल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण तसेच बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन दाणे यांचा सत्कार उपस्थित नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

पोलीस चौकीलगतच्या मोकळ्या परिसरात अनेक वाहने लावली जात असून काहींनी अतिक्रमण करून टपऱ्या टाकल्या होत्या. परंतु तात्काळ अतिक्रमण काढून टाकण्यात आल्याने हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला. लवकरच मोकळा परिसर एसटी महामंडळाकडे देण्यात येणार असल्याचे उपस्थित नगरसेवक अमित घुमटकर यांनी सांगितले.

 

 

चौकीचे चांगले, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम केल्याबद्दल पोलीस अधिकारी आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत कॉन्ट्रॅक्टर सुभाषशेठ होले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस चौकीचे काम चांगले केल्याबद्दल सर्वांनी कौतुक केले.बस स्थानकालगत पोलीस चौकी झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.