Khed Murum Mining Case | खेडमध्ये मुरुम माफियांची मुजोरी: तहसीलदार व पथकाला चिरडण्याचा प्रयत्न, २७०० ब्रास अवैध मुरुम उपसा उघड!

रेटवडी येथे महसूल पथकाच्या वाहनासमोर डंपरमधून मुरुम खाली टाकून पाठलाग रोखण्याचा प्रयत्न; कनेरसर येथील एमआयडीसीसाठी संपादित शासकीय जमिनीवर २७०० ब्रास अवैध उत्खनन उघड, प्रकरणी गुन्हा दाखल.

Khed Murum Mining Case | खेडमध्ये मुरुम माफियांची मुजोरी: तहसीलदार व पथकाला चिरडण्याचा प्रयत्न, २७०० ब्रास अवैध मुरुम उपसा उघड!

 

महावार्ता लाईव्ह | शासकीय कामात अडथळा आणत थेट महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर डंपरमधील मुरुम खाली करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना खेड तालुक्यातील रेटवडी येथे घडली आहे. याप्रकरणी कनेरसरच्या मंडल अधिकारी शीला शेवाळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

नेमकी घटना काय घडली?

२२ ऑक्टोबर रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांचे पथक पाबळ रस्त्याने अवैध गौण खनिज उत्खनन तपासणीसाठी जात होते. निमगाव हद्दीत खेड सिटीजवळ एक हायवा डंपर (क्रमांक: MH 12 YQ 7946) मुरुमाची वाहतूक करताना दिसला. पथकाने पाठलाग सुरू करताच, एका स्कूटीवरील दोघांनी शासकीय वाहनांसमोर दुचाकी आडवी करून रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी ओळख सांगताच त्यांनी गाडी बाजूला घेतली.

 

जीवघेणा हल्ला

मौजे रेटवडी येथील कॅनॉलच्या रस्त्यावर हायवा डंपरचा पाठलाग करत असताना, अधिकाऱ्यांना इजा व्हावी व पाठलाग थांबावा या उद्देशाने डंपरचालकाने धावत्या डंपरचा पाठीमागील भाग अचानक वर उचलला. सुमारे ६ ब्रास मुरुम थेट अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर रस्त्यावर कोसळला. चालकांनी प्रसंगावधान राखून वाहने थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली; मात्र रस्ता पूर्ण अडवला गेल्याने डंपरचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

 

२७०० ब्रास मुरुमाची चोरी

या घटनेनंतर महसूल पथकाने कनेरसर (हजारेवस्ती) येथील एमआयडीसीसाठी संपादित शासकीय जमिनीवरील गट क्र. १४८६ मध्ये धाड टाकली. तेथे दोन जेसीबी मशिन्सद्वारे बेकायदेशीर उत्खनन सुरू होते. पथकाला पाहताच जेसीबी चालक मशिन्स काही अंतरावर सोडून अंधारात पसार झाले. तपासणीदरम्यान तब्बल २७०० ब्रास मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन व चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

 

संशयितांची नावे निष्पन्न

घटनास्थळी सापडलेला इसम गणेश साहेबराव हजारे (रा. कनेरसर) याच्याकडे चौकशी केली असता, उत्खनन करणाऱ्या दोन्ही जेसीबी त्याच्या मालकीच्या असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पळून गेलेला हायवा डंपर हा सुयोग पांडुरंग पानसरे (रा. पाबळ, ता. शिरूर) याचा असल्याचे समोर आले आहे. शासकीय कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.