Jaidwadi Pollution Alert | खेडमध्ये 'विषारी' धुराचे लोट! जैदवाडीतील प्लायवूड कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त; फुफ्फुसांच्या गंभीर आजारांचा धोका

जैदवाडीतील प्लायवूड कंपनीच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.

Jaidwadi Pollution Alert | खेडमध्ये 'विषारी' धुराचे लोट! जैदवाडीतील प्लायवूड कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त; फुफ्फुसांच्या गंभीर आजारांचा धोका

 

महावार्ता लाईव्ह | पुणे-नाशिक महामार्गालगत खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका प्लायवूड कंपनीने संपूर्ण परिसराला विषारी धुराच्या विळख्यात ढकलले आहे. कंपनीच्या चिमणीतून हवेत सोडल्या जाणाऱ्या रासायनिक आणि काळ्याकुट्ट धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले असून, श्वसनाचे आणि फुफ्फुसांचे गंभीर आजार बळावण्याची भीती निर्माण झाली आहे.


रात्रीच्या अंधारात सोडला जातोय विषारी धूर

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत प्लायवूड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घातक रसायनांचा (केमिकल्सचा) वापर केला जातो. प्रक्रियेदरम्यान बॉयलरमधून निघणारा विषारी धूर थेट हवेत सोडला जात आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी हा काळाकुट्ट धूर प्रामुख्याने सायंकाळी, रात्रीच्या वेळी आणि कधीतरी भल्या पहाटे हवेत सोडला जातो. यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात उग्र दर्प आणि धुराचे साम्राज्य पसरते, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या श्वसनसंस्थेवर होत आहे.

 

 

अन्नपदार्थांमध्ये मिसळतंय रसायन; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

ही कंपनी ज्या परिसरात आहे, तिथे महामार्गालगत अनेक नामांकित हॉटेल्स, प्रसिद्ध ढाबे, चहाच्या टपऱ्या, वडापावचे स्टॉल्स आणि परमिट रूम बिअरबार आहेत. हवेत सोडला जाणारा हा विषारी रासायनिक धूर थेट या हॉटेल्समध्ये शिजवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांवर जाऊन बसत आहे. यामुळे नकळतपणे हे रासायनिक धूरमिश्रित अन्न प्रवाशांच्या आणि ग्राहकांच्या पोटात जात असून, यातून भयंकर विषबाधा आणि आरोग्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

स्थानिक व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळण्याची भीती

पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणारे हजारो नागरिक या परिसरात जेवणासाठी किंवा अल्पोपहारासाठी थांबतात. मात्र, प्लायवूड कंपनीतील काळाकुट्ट धूर हवेत सोडला जात असल्याने नकळत हॉटेल मध्ये शिजवलेल्या  अन्नात मिसळत असल्याची माहिती जर प्रवाशांना समजली, तर या परिसरात एकही प्रवासी गाडी थांबवणार नाही. यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या दुकानदारांच्या व्यवसायावर गदा येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.

 

प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेत आहे का?

लोकांच्या जीवाशी एवढा मोठा खेळ सुरू असताना आणि महामार्गावर उघडपणे प्रदूषण होत असताना स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) नेमके काय करत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. लोकांच्या आरोग्याशी आणि व्यावसायिकांच्या पोटाशी खेळणाऱ्या या प्लायवूड कंपनीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून पर्यावरणावर देखील थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.