applicants denied licenses | दादागिरीला लगाम! १५ जणांचे शस्त्र परवाने रद्द; ६८ नव्या अर्जदारांना परवाना नाकारला, परवानाधारकांमध्ये खळबळ

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची धडक कारवाई ; गुन्हे आणि शस्त्रांचा गैरवापर; पाच जणांचे परवाने रद्द

applicants denied licenses | दादागिरीला लगाम! १५ जणांचे शस्त्र परवाने रद्द; ६८ नव्या अर्जदारांना परवाना नाकारला, परवानाधारकांमध्ये खळबळ

 

महावार्ता लाईव्ह | पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. शहरात परवानाधारक शस्त्रांच्या जोरावर दादागिरी करणाऱ्यांना चाप बसावा या उद्देशाने आयुक्तांनी १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केले असून, नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या तब्बल ६८ जणांचे अर्ज फेटाळले आहेत. या निर्णयामुळे शस्त्र परवान्याच्या आधारावर दबाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

शस्त्र परवान्यांबाबत चौबे यांचे कठोर धोरण

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शस्त्र परवाने देताना अत्यंत काटेकोर भूमिका घेतली आहे. केवळ खरोखर आवश्यक आणि कायदेशीर कारणे असलेल्या व्यक्तींनाच शस्त्र परवाने देण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. नुकत्याच झालेल्या शस्त्र परवाना प्रकरणांच्या आढाव्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली.

 

गुन्हे आणि शस्त्रांचा गैरवापर; पाच जणांचे परवाने रद्द

प्राथमिक चौकशीत शस्त्रांचा गैरवापर केल्याचे तसेच विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आलेल्या खालील पाच परवानाधारकांविरोधात कारवाई करण्यात आली—

मयुर काळुराम भोईर (हिंजवडी), सुभाष भिकाजी सपकाळ (नवी सांगवी), विजय नामदेव लांडे (भोसरी), साहिल राजेंद्र ढमाले (देहूगाव), शांताराम दत्तात्रय चव्हाण (आंबेठाण) या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी केल्यानंतर संबंधितांकडून कसूर झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले.

 

मुदतीत शस्त्र खरेदी न केल्यानेही कारवाई

ज्या व्यक्तींना शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला होता, मात्र निर्धारित कालावधीत त्यांनी शस्त्र खरेदी केले नाही, अशा दोन परवानाधारकांचे परवाने देखील रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना मिळाल्यानंतर त्याच्या अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

वृद्धत्व आणि मृत्यूमुळे आठ परवाने रद्द

याशिवाय वृद्धत्वामुळे शस्त्र वापरण्यास असमर्थ झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या एकूण आठ परवानाधारकांचे शस्त्र परवानेही रद्द करण्यात आले. अशा प्रकारे विविध कारणांमुळे एकूण १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

 

६८ जणांना थेट नकार

नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या ६८ व्यक्तींच्या अर्जांची तपासणी केल्यानंतर त्यांना परवाना देण्यासाठी कोणतेही सबळ कारण अथवा आवश्यकतेचा पुरेसा आधार नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व अर्जदारांना थेट नकार देण्यात आला आहे.

 

दादागिरी करणाऱ्यांना स्पष्ट संदेश

शस्त्र परवाना हा प्रतिष्ठेचे किंवा दादागिरीचे साधन नसून जबाबदारीची बाब आहे, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलीस आयुक्तांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि शस्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे कठोर धोरण कायम राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

 

"परवाना म्हणजे मिरवणूक नव्हे, जबाबदारी"

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या या कारवाईमुळे परवानाधारक शस्त्रांच्या जोरावर दबाव टाकणाऱ्या आणि कायद्याची भीती न बाळगणाऱ्या घटकांना स्पष्ट इशारा मिळाला असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.