खेड तालुक्यात दुचाकीचोरांचे थैमान

खेड तालुक्यात दुचाकीचोरांचे थैमान

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील शहरांमधून दुचाकी (मोटर सायकल) चोरीच्या घटना दररोज घडत आहेत.दुचाकी चोरट्यांच्या टोळ्यांना पकडण्यात पोलिसदल असमर्थ ठरत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समाजातील अनेक नागरिकांकडून होत आहे.

खेड तालुक्यात राजगुरूनगर,चाकण,आळंदी व महाळुंगे अशी चार पोलीस ठाणे असून त्यात्या ठाण्यातर्गत काही पोलीस दुरक्षेत्र चौकी आहेत.तालुक्यात राजगुरूनगर, चाकण व आळंदी या मोठ्या शहरांतर्गत अनेक गृहप्रकल्प व हौसिंग सोसायट्या आहेत.वरील शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने दररोज घडत आहेत.दुचाकी चोरणारे हे अट्टल चोरटे असून सोसायटी परिसरात पार्क केलेली दुचाकीची किंवा चारचाकी कारची दिवसा पाहणी करून मध्यरात्रीच्या दरम्यान बनावट चावीने चालू करून गाड्या चोरून नेत आहेत.राजगुरूनगर शहरातील हौसिंग सोसायट्यांमधून दुचाकी चोरीच्या असंख्य घटना घडल्या असून अद्याप काहींचा तपास पोलिसांना लागला नाही.

पोलीस रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करताना मुख्य रस्त्यानेच सायरन वाजवत गाडी नेतात.परंतु सध्या नागरीकरण अनेक शहरांच्या परिसरातील असलेल्या वाड्यावस्त्यांवर वाढले असून त्या ठिकाणी अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत.बिल्डर गृहप्रकल्पातील फ्लॅट विकून आणि सोसायटी करून फ्लॅटधारक लोकांच्या ताब्यात गृहप्रकल्प देतात.त्यानंतर वॉचमन नेमणे ही सर्वस्वी जबाबदारी सोसायटीची आहे.परंतु अनेक ठिकाणी वॉचमन नाहीत,तर रात्री गेट देखील लावीत नसल्याने हा आयता मोका दुचाकी चोरट्यांना मिळतो आहे.तसेच काही सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत ही वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे.

दुचाकी चोरटे हे दुचाकी चोरून नेल्यावर इंजिन व टायर काढून गाडीचा सांगाडा अज्ञात रस्त्याच्या कडेला लावून निघून जातात अशा काही घटना घडल्या आहेत. काही गाड्या नवीन असेल तर त्याचा तपास देखील लागून देत नाहीत.सध्या राजगुरूनगर शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.दुचाकी चोरट्यांपुढे पोलीस यंत्रणा देखील हतबल झाली असून चोरून नेलेल्या दुचाकी शोधण्यात पोलिस असमर्थ ठरत आहेत.पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची एखादी टोळी किंवा त्यांचा म्होरक्या पकडला तर अशा घटनांना आळा बसणार असून यासाठी पोलिसांनी दक्ष राहून टोळीचा फर्दाफाश करण्याची गरज निर्माण झाली आहे.पाहूया आता पोलीस यंत्रणा चोरट्यांना पकडण्यात यशस्वी होते की असमर्थ ठरते हे नक्कीच येणाऱ्या पुढील काळात समजणार आहे.