Khed Crime | दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एक लाखांचे दागिने लंपास
खेड तालुक्यातील रेटवडी-जरेवाडी येथे दिवसाढवळ्या फसवणूक; अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील रेटवडी-जरेवाडी येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत तब्बल एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खेड पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, निता सुनिल पवळे (वय ४७, व्यवसाय शेती, रा. रेटवडी-जरेवाडी, ता. खेड) या ( दि.३जून) रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात भांडी घासत होत्या. त्यावेळी दोन अज्ञात इसम त्यांच्या घरी आले. त्यांनी तांब्याची भांडी व पायातील चांदीचे पैजण पॉलिश करून स्वच्छ करून देण्याचे आमिष दाखविले.
या दोघांनी तांब्याची भांडी आणि पैजण स्वच्छ करून दिल्यानंतर महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी कानातील कर्णफुल आणि गळ्यातील मिनी गंठण पॉलिश करून देण्याची ऑफर दिली. त्यावर विश्वास ठेवून पवळे यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण आणि डाव्या कानातील सोन्याचे कर्णफूल त्या इसमांकडे दिले.
मात्र, दागिने हातात मिळताच दोन्ही इसमांनी ते घेऊन घरासमोरून धूम ठोकली. ते रस्त्यावर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर बसून पसार झाले. चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण तसेच २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफूल असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
घराघरांत जाऊन भांडी, दागिने किंवा चांदीच्या वस्तू पॉलिश करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. अशा संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
