मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात ; पुण्यातील चार विद्यार्थी ठार
पुणे : न्यूज नेटवर्क
मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजेजवळ शनिवारी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास मोटार व ट्रक अपघातात चार विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवम राहुल कोकाटे (वय १९, रा.पुणे), प्रियम सत्येंद्र राठी (वय. २०, रा. नारायण पेठ, पुणे), ऋषिकेश मनोज शिंदे (वय २१, रा. बिबवेवाडी, पुणे) व मोहनिश संगम विश्वकर्मा (वय २०, रा. धनकवडी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकत होते. त्यांनी दुपारी पावणेतीनच्या सुमारास बाहेर फिरण्याचे ठरवले. पुणे येथून आपल्या स्कोडा मोटारीने (एम. एच. १२ एके ११११) निघाले. मुंबईकडे जात असताना पावणेचारच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजेजवळ मोटारचालकाला सेवा रस्त्यावर नादुरूस्त ट्रक अचानक दिसला. त्यामुळे मोटारीवरील त्याचे नियंत्रण सुटून, मोटार ट्रकवर (एमएच४६ एआर ९६६५) पाठीमागून जोरात आदळली. मोटारीचा वेग इतका होता, की ती ट्रकखाली घुसली. यामुळे चारही विद्यार्थी गंभीर जखमी स्थितीत मोटारीमध्ये अडकले.
मागून येणाऱ्या वाहनचालकांनी आरडाओरड केल्याने इतर वाहने थांबली. तसेच त्वरित महामार्ग पोलिस, आयआरबी कर्मचारी व शिरगाव पोलिस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी प्रयत्न करून मोटार बाहेर काढून जखमींना सोमाटणे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना घोषित केले.
---------------------------------------------------------------
