Pune Jilha Parishad Election: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे; उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील ; राष्ट्रवादीकडून नावे निश्चित, बिनविरोध निवड होणार !
राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ७३ पैकी ५१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे यांची निवड केली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. या घोषणेनंतर दौंड शहरात कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पक्षाकडे निर्विवाद बहुमत असल्याने आज होणाऱ्या निवड प्रक्रियेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होणार हे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी 'सर्वसाधारण' गटासाठी आरक्षित आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटी नंतर जिल्हा परिषदेला अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ७३ पैकी ५१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे या पदांसाठी पक्षाचा एकहाती दावा आहे.
बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे पाटील यांची नावे अंतिम केली गेली.
वीरधवल जगदाळे हे दौंड तालुक्यातील खडकी-देऊळगाव गटातून निवडून आलेले आहेत. ते अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. सलग तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले जगदाळे यांना प्रशासकीय कामाचा उत्तम अनुभव आहे. तसेच पवार कुटुंबीयांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. दौंड तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान दुसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी वैशाली आबणे या दौंडच्या अध्यक्ष झाल्या होत्या. अनेक वर्षांनंतर दौंडला हा 'लाल दिवा' मिळाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाके वाजवले.
विवेक वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्यातील पारगाव-जारीवाडी गटातून निवडून आले आहेत. ते आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आहेत. त्यांच्याही नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी होती, परंतु उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले.
▪️निवड प्रक्रियेचे वेळापत्रक
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
- सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत: अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.
- दुपारी ३ वाजता: विशेष सभेला सुरुवात.
- उमेदवारांच्या अर्जांची छाननी.
- छाननीनंतर १५ मिनिटांत अर्ज मागे घेण्याची संधी.
- अंतिम यादी जाहीर.
एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास 'हात उंचावून' मतदान होईल. मात्र, राष्ट्रवादीकडे बहुमत असल्याने फक्त एकच अर्ज येऊन बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
या निवडीमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयाने पक्षातील एकता आणि अनुभवी नेत्यांना प्राधान्य देण्याची भूमिका दिसून आली आहे.