शरीरात प्राण आहे तोपर्यंत समाज सेवेचे कार्य करीत राहणार : अण्णा  हजारे 

शरीरात प्राण आहे तोपर्यंत समाज सेवेचे कार्य करीत राहणार : अण्णा  हजारे 

महावार्ता लाईव्ह - राजगुरूनगर

"शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी हे समाज सेवेचे कार्य करत राहणार, हा मी निर्णय घेतलाय "असे प्रतिपादन थोर जेष्ठ समाज सेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी केले. राळेगण सिद्धी येथे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास  पुणे जिल्हा यांनी आयोजित केलेल्या पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.    

ते पुढे म्हणाले, "सर्व सामान्य जनतेला न्याय मिळणेसाठी माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, जनतेची सनद इत्यादी दहा कायदे अनेक आंदोलन करून शासनाला करायला लावले. त्या कायदया॓ची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे कार्य करणाऱ्यांनी जागरूकपणे पाहिले पाहिजे. "जाऊदया, काय करायचे आपल्याला" असे जर कार्यकर्ते म्हणायला लागले, तर मग अधिकाऱ्यांचे जनतेची कामे न करणे हे संपणार नाही. खरं स्वातंत्र्य येणार नाही, खरी लोकशाही येणार नाही. लोकांनी, लोकांच्या करीता, लोकांच्या सहभागातून चालविलेली व्यवस्था  म्हणजे लोकशाही. ती लोकशाही येणार नाही. ती जर येणार नसेल तर हुकूमशाहीत आपलं जीवन घालवायचे असेल तर घालवा. आता माझे वय झालय ८४ वर्षाचे. किती काम करायचे आता, केलय एवढे खूप झालय आता."                                     

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, "कार्यकर्त्यांनी आपले जीवनाचे ध्येय व चारित्र्य चांगले ठेवले पाहिजे. जीवनात अपमान सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे. गावासाठी प्रामाणिकपणे जीव ओतून समाजकार्य केले पाहिजे. दिव्यासारखं जळताना, प्रकाश देताना लोकांना दिसले पाहिजे. सवत:साठी जे जगतात ते कायमचे मरतात पण जे दुसऱ्या साठी जगतात ते कायमचे जगतात. जनतेला न्याय मिळणेसाठी केलेल्या कायदयाची अंमलबजावणी शासकीय अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे केली पाहिजे. आय. एस. आय, आय. पी. एस. अधिकारी यांना वाकविण्याची ताकद जनतेत आहे. त्यांना जनता वाकवू शकते. अधिकारी घाबरतात ते न्यायालयाला. कारण न्याय व्यवस्था ही सर्वाेच व्यवस्था आहे. अधिकारया॓ना कोर्टात खेचू शकते, हे सर्व कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.          

यावेळी हिंद स्वराज ट्रस्टचे विश्वस्त राधेश्याम जगताप, अशोक सबन, सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधिश के. बी. कटके, पुणे जिल्हा संघटक शिवाजीराव खेडकर, सहस॓घटक प्रकाश पाचारणे, संजय पठाडे, लाभिष औटी, राळेगणसिद्धी गावचे सरपंच इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील व पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील संघटक प्रमुख, कार्यकारणी, सदस्य कार्यकर्ते २०० चे संख्येने उपस्थित होते.                                                   

या प्रशिक्षण शिबिरात अपर जिल्हाधिकारी के. सी. कारकर, गणपत पंडीत, विठ्ठल बुलबुले, अजित देशमुख, इत्यादींनी कार्कर्त्यांना माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, जनतेची सनद सेवा हमी कायदा, पंचायत राज, ग्रामसभा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. सतीश चांभारे यांनी सूत्रसंचालन केले, तर राधेश्याम जगताप यांनी आभार मानले.