School Sports Festival | पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

‘जर्नी ऑफ अ चॅम्पियन’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्रीडा स्पर्धा, प्रात्यक्षिके आणि पालकांच्या सहभागाने महोत्सव रंगला.

School Sports Festival | पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

 

महावार्ता लाईव्ह | रोहकल (ता. खेड) येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा वार्षिक क्रीडा महोत्सव २५ व २६ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. ‘जर्नी ऑफ अ चॅम्पियन’ (Journey of a Champion) या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा, मैदानी खेळ आणि आकर्षक प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित करण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.

 

या महोत्सवाला पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा शिक्षणतज्ज्ञ डॉ. धनंजय लक्ष्मण मदने, पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा शिक्षण विभागाचे प्रमुख माणिक देवकर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू श्रुतिका सरोदे आणि पोदार पुणे हब-१ चे जनरल मॅनेजर कर्नल अभिजीत महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

 

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, चिकाटी, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते. क्रीडाक्षेत्रात करिअर करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती समर्पण आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

 

क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर धावणे, अडथळा शर्यत, फन रेस, रिले शर्यत आणि शटल रेस अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय योगासने, लेझीम, पोम-पोम ड्रिल, हॉकी ड्रिल, हुला-हूप्स, एरोबिक्स, योगा पिरॅमिड, रेनबो रिदम, झुंबा, जिम्नॅस्टिक्स आणि डंबेल ड्रिल यांसारख्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांची शारीरिक क्षमता, एकाग्रता, समन्वय आणि सांघिक कौशल्याचे दर्शन घडले.

 

 

या महोत्सवात पालकांसाठीही विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोरखेच आणि पुस्तकाचा समतोल राखण्याच्या स्पर्धांमध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही क्रीडा महोत्सवाचा आनंद घेता आला.

 

दरम्यान, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पवन बांदे, कांबळे तसेच दामिनी पथकाच्या सदस्या दीपाली गावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देत सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देण्यात आली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केले. कार्तिक गाडे, आराध्या गुलिया, हृदया नरवडे, ओवी शिंदे, सिद्धी कांबळे, सोनल झरे, अयान अन्सारी, समृद्धी चबिले, आरोही राजपूत, अवनी जाधव, श्रेयस बांगर आणि प्रणवी आलमसेठी यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. शिक्षिका अक्षता जगताप, पूजा कदम आणि जान्हवी राजपूत यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

 

 

शाळेचे मुख्याध्यापक विशाल जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांचे महत्त्व स्पष्ट केले. खेळामुळे शारीरिक विकासासोबतच मानसिक सक्षमता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना विकसित होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

 

महोत्सवाच्या समारोपप्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, आभारप्रदर्शन आणि ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘स्ट्राँगर, फास्टर, हायर, टुगेदर’ या ब्रीदवाक्याला अनुसरून पार पडलेल्या या क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, शिस्त आणि सांघिक भावनेची प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.