Pait Primary Health Center | पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून रात्री अचानक पाहणी
खेड तालुक्यातील पाच मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेट; आरोग्य कर्मचाऱ्यांना कामात दक्ष राहण्याचे आदेश
महावार्ता लाईव्ह | मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात निर्माण केलेल्या सुविधांचा फायदा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना द्यावा. ओपीडी आणि डिलिव्हरी पेशंट वाढले पाहिजेत यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कामात दक्ष राहावे, हलगर्जी करू नये, अशा कडक सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव, राजगुरूनगर, आंबोली, कुडे आणि पाईट या मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉ. हंकारे यांनी अचानक (दि. १७) रोजी भेट दिली. पाईट येथील केंद्राला रात्री ९ वाजता भेट दिल्यानंतर तेथील बाह्यरुग्ण विभाग, प्रशासन, प्रयोगशाळा, नोंदणी कक्ष, स्वागत कक्ष, उपचार प्रक्रिया कक्ष, औषधालय, हिरकणी कक्ष, आपत्कालीन निर्गमन, सर्वसाधारण पुरुष आणि महिला कक्ष, महिला प्रस्तुती कक्ष आदी विभागांची बारकाईने पाहणी केली.
मॉडेल पीएचसी अंतर्गत पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक नवनवीन सुविधा निर्माण केल्या आहेत. येथील सर्व सुविधांची पाहणी केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण सूचना यावेळी डॉ. हंकारे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. प्रयोगशाळा आणि इंजेक्शन कक्ष यासह हिरकणी कक्षाबाबत महत्त्वाचे बदल करण्याच्या सूचना डॉ. हंकारे यांनी यावेळी उपस्थितांना केल्या. तसेच अपूर्ण लाईट दुरुस्ती त्वरित करावी. रुग्णवाहिकेचा उपयोग पेशंटला आणण्यासाठी आणि उपचारानंतर पुन्हा घरी सोडण्यासाठी करावा. डॉक्टरांनी पेशंट घरी सोडल्यानंतर आपुलकीने फोन करा, म्हणजे पेशंटला बरे वाटेल. आरोग्य केंद्रात डिलिव्हरी वाढ झाली पाहिजे, याची काळजी सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.
ऑपरेशन थिएटर परिसरात लाईट दुरुस्ती करून सुरू करावे. सोलर वॉटरची मागणी करा, ते देण्याची व्यवस्था केली जाईल, अशा सूचना डॉ. हंकारे यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या रात्रीच्या अचानक भेटीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी आरोग्य केंद्राच्या एन्ट्री परिसरात काही कामे आणि डिजिटल बोर्ड लावण्याच्या सूचना केल्या असता, ही कामे तात्काळ केली जातील, असे आश्वासन डॉ. हंकारे यांनी त्यांना दिले. तसेच मॉडेल पीएचसी अंतर्गत झालेली कामे चांगली व दर्जेदार झाल्याचे डॉ. हंकारे यांनी पाहणीअंती सांगितले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी विलास माने, पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक शेळके, डॉ. ऐश्वर्या वाजे, डॉ. अभिषेक खडुळ, आरोग्य कर्मचारी वर्षा खोडके, महेंद्र साठे, श्रद्धा चपटे, प्रिया देशपांडे, सुनीता जावीर, नीता मोठे, प्रवीण बांबळे, विजया बोरचटे, विद्या आहेर, नवनाथ डांगले, शर्मिला निटवे, सूरज भिल्ल, मंदा पडवळ आदी उपस्थित होते.
पाईट आरोग्य केंद्रात सर्व सुविधा निर्माण केल्या आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांची काळजी व्यवस्थित घेऊन उपचार करावेत. केंद्रात औषध साठा आणि सर्पदंश वरील लस उपलब्ध आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल सारखे चकचकीत आरोग्य केंद्र बनविले आहे. या केंद्राचा उपयोग इथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावा. - शरद बुट्टे पाटील - माजी सभापती
“जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोणत्याही कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी सर्वांनी दक्ष राहून काम करावे. दिवसा आणि रात्री अपरात्री उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा द्या. रात्री उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची विशेष काळजी घेऊन उपचार करावेत. लवकरच रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.” — डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी