Pune | शिरूर लोकसभा मतदार संघात ६५ लाखांची रोकड जप्त

Pune | शिरूर लोकसभा मतदार संघात ६५ लाखांची रोकड जप्त

महावार्ता लाईव्ह | जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. लाखोंची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

आचारसंहिता काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

स्टीलचा व्यापारी असलेल्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याच्या गाडी मधून ५१ लाख १६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.१० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि पथकाने शिरूरमध्ये ही रोकड नाकाबंदी दरम्यान जप्त केली आहे.

याबाबत निवडणूक आयोग आणि आयकर विभागला माहिती देऊन ही रोकड आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. 

तर दुसऱ्या घटनेत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ ८ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून गाडीतून १३ लाख ९० हजाराच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि ३० लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे.