Khed Panchyat Samiti movement | खेड तालुक्यात RTE प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी समिती स्थापन करून प्रवेश फेऱ्या स्थगित करण्याची मागणी
पंचायत समितीच्या मासिक सभेपूर्वी सात सदस्यांचे आंदोलन; शिक्षण विभागातील अनियमिततेविरोधात घोषणाबाजी
महावार्ता लाईव्ह | गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने राबविलेल्या शिक्षणाचा हक्क (RTE) प्रवेश योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाच्या खेड पंचायत समिती सदस्यांनी केला आहे. या प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील प्रवेश फेऱ्या स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात अश्विनी सोमनाथ तरस, महेंद्र मेदनकार, निखिल थोरवे, शंकर कावडे, श्रद्धाताई मांडेकर, दिनेश हांडे आणि मनिषाताई हिले या सदस्यांनी सहभाग घेतला.
RTE योजनेअंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि वशिलेबाजीला आळा बसावा यासाठी शासनाने ऑनलाइन लॉटरी पद्धतीचा अवलंब केला आहे. मात्र, लॉटरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांचे नोंदणीकृत भाडेकरार, घरमालकीचे उतारे, वीजबिल, ओळखपत्र व इतर वैध रहिवासी पुरावे सादर करूनही पालकांना वारंवार कार्यालयात बोलावले जाते. अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. काही प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्यानंतरच कागदपत्रे मंजूर केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, पात्र विद्यार्थ्यांना अपात्र ठरवून प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी मिळावी यासाठी खोटी कारणे दाखवून अर्ज नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या तीन टप्प्यांच्या गृहचौकशी प्रक्रियेचाही गैरवापर होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. गृहचौकशीदरम्यान शेजाऱ्यांचे जबाब घेणे, पंचनामे करणे आणि त्याआधारे पात्रता ठरविण्याच्या प्रक्रियेत काही पालकांना दबावाखाली ठेवून आर्थिक मागण्या केल्या जात असल्याचा दावा करण्यात आला.
तसेच, गुगल मॅप लोकेशनमधील तांत्रिक त्रुटींचा आधार घेत अनेक अर्जदारांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फॉर्म भरताना लोकेशन काही मीटरने सरकल्यास त्याचा मुद्दा उपस्थित करून अर्जदारांना त्रास दिला जात असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
काही पालकांच्या माहितीनुसार, गृहचौकशी अनुकूल दाखविण्यासाठी, प्रतीक्षा यादीतील नाव वर आणण्यासाठी किंवा इतर तांत्रिक कारणांवरून अर्ज मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाचखोरी होत असल्याच्या चर्चा आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून सत्यता पडताळावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांनी या कथित गैरप्रकारांबाबत मौन का बाळगले आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत त्यांनी ठोस कारवाई करावी, अन्यथा त्यांच्यावरही संशय निर्माण होईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
“गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार हा समाजाच्या आणि देशाच्या भविष्यासाठी घातक आहे. दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे; अन्यथा संबंधित पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, पंचायत समितीच्या मासिक सभेला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व शिवसेना शिंदे गटाच्या ७ पंचायत समिती सदस्यांनी पंचायत समितीच्या पायऱ्यांवर निषेध आंदोलन केले. यावेळी भ्रष्टाचारविरोधी फलक परिधान करून घोषणाबाजी करण्यात आली.
RTE प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांच्या आरोपांमुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
