संतोषनगरला सव्वा कोटी खर्चाच्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिराची उभारणी

सुंदर कलाकृतीचे मंदिरामुळे गावच्या वैभवात भर, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

संतोषनगरला सव्वा कोटी खर्चाच्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिराची उभारणी

राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील संतोषनगर (भाम) येथे गावकऱ्यांच्या   लोकवर्गणीतून ग्रामदैवत 'भैरवनाथ महाराज' यांचे सव्वा कोटी रुपये खर्चाचे आणि सुंदर कलाकृतीचे भव्यदिव्य मंदिर उभारले जात आहे.
     संतोषनगर हे गाव तालुक्यातून गेलेल्या पुणे - नाशिक महामार्गावर वसले आहे.महसुली व ग्रामपंचायत असलेल्या वाकी बुद्रुक या गावामध्ये संतोषनगर गावचा समावेश होता. परंतु काही वर्षांपूर्वी संतोषनगर ग्रामपंचायत स्वतंत्ररित्या अस्तित्वात आली.त्यामुळे दोन्ही गावे वेगवेगळी झाली. परंतु संतोषनगर गावठाणात ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचे मंदिर नव्हते व मंदिर बांधण्यासाठी जागाही नव्हती. गावच्या परिसरात मुबलक गायरान क्षेत्र असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार शासनाने मंदिरासाठी जागा बहाल केली.संतोषनगर ग्रामस्थांच्या एकीतून व सर्वांच्या लोकवर्गणीतून सव्वा कोटी रुपये खर्चाचे सुंदर कलाकृतीचे मंदिर उभे राहात आहे.ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर हे सुंदर, आखीव रेखीव व कोरीव कलाकृतीचा नमुना असल्याने हे मंदिर गावचे वैभव ठरणार असून या मंदिरामुळे गावच्या वैभवात भर पडणार आहे.
     भैरवनाथ मंदिर उभारणीसाठी प्रथम जागेचा प्रश्न सुटल्यानंतर पैशाचा प्रश्न उभा राहिला असता ग्रामस्थांच्या एकजुटीतून लोकवर्गणी गोळा करण्याचे कार्य ग्रामस्थांनी  यशस्वी केले.लोकनियुक्त विद्यमान गावच्या सरपंच सौ. अरुणा शरद कड पाटील यांनी सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यावर प्रथम ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर उभारले जाईल अशी जाहीरपणे घोषणा केली होती.त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच,उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच ग्रुप यांनी मंदिर उभारणीसाठी लोकवर्गणी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले.सव्वा कोटींचा निधी गोळा करणे सोपे काम नव्हते,परंतु गावातील काही दानशूर मंडळी यांनी स्वतः अधिकची लोकवर्गणी दिली आणि बाहेर गावच्या अनेक दानशूर व्यक्तींकडून मंदिरासाठी लोकवर्गणी गोळा केली.त्यामुळे मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू असून अंतिम टप्प्यात आलेले आहे.
        मंदिराचे कलात्मक कोरीव काम पूर्ण झाले असून कलरचा पहिला हात मारण्याचे काम सुरू आहे.त्यानंतर मार्बल फरशीचे काम होणार आहे.परिसरात मंदिर देखणे ठरत आहे.ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मूर्तीसह अन्य देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थानी यावेळी सांगितले.
---------------------------------------------