Khed | कोहिंडे बुद्रुक अंगणवाडी इमारतीचे काम तीन वर्षांपासून रखडले

अंगणवाडीतील बालकांना सध्या बसायला जागा नसल्याने अक्षरशः अडचणीच्या ठिकाणी बसण्याची नामुष्की ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Khed | कोहिंडे बुद्रुक अंगणवाडी इमारतीचे काम तीन वर्षांपासून रखडले

राजगुरुनगर : अपुरा निधी असल्याने कोहिंडे बुद्रुक (ता.खेड) येथील लहान मुलांच्या अंगणवाडीचे काम हे गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत रखडले आहे.यामुळे अंगणवाडीतील बालकांना सध्या बसायला जागा नसल्याने अक्षरशः अडचणीच्या ठिकाणी बसण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याची सत्यस्थिती पाहायला मिळत आहे.

 

पुणे जिल्ह्यातील ११७ अपूर्ण अवस्थेतील अंगणवाड्याना निधी नुकताच मंजूर करण्यात आला.परंतु खेड तालुक्यातील अपूर्ण अवस्थेतील ७ अंगणवाड्याना निधी मिळावा यासाठी खेड पंचायत समितीतील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून लेखी रिपोर्ट जिल्हा परिषदेला गेलाच नाही. यामुळे तालुक्यातील अंगणवाड्याना निधी मंजूर झाला नाही.

 

कोहिंडे बुद्रुक गावठाणातील अंगणवाडी इमारतीचे काम गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे.इमारत उभारली पण दरवाजे व खिडक्या बसविल्या नाहीत,इमारतीला प्लास्टर नाही,फरशी बसविली नाही,रंगरागोटी केली नाही अशी अनेक कामे अपूर्ण आहेत.त्यामुळे येथील अंगणवाडीतील लहान बालके कुठेतरी अडचणीच्या ठिकाणी बसत आहेत.इमारतीचे काम अपूर्ण असल्याचे स्थानिक ग्रामपंचायत,पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच विस्तार अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले.परंतु विस्तार अधिकाऱ्यांनी कधीही अंगणवाड्यांचे बांधकाम काय स्थितीत आहे यासाठी कामास्थळी पाहणी न केल्याने ही बाब त्यांच्या निदर्शनास आली नाही.अर्धवट स्थितीतील अंगणवाड्यांचा रिपोर्ट करावा असे जिल्हा परिषदेकडून पत्र येऊन सुद्धा त्याकडे प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

 

सध्या पावसाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले इमारत अपूर्ण असल्याने कुठेतरी अडचणीच्या ठिकाणी बसविले जातात ही बाब गंभीर आहे.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी अपूर्ण अंगणवाड्याना निधी द्यावा अशी सूचना डीपीसीच्या मिटिंगमध्ये केल्याने जिल्ह्यातील ११७ अंगणवाड्याना निधी मिळाला.केवळ रिपोर्ट केला नाही म्हणून खेड तालुक्यातील ७ अंगणवाड्या निधी मंजूर होऊ शकला नाही.याबाबत बुट्टे पाटील यांनी पंचायत समितीत येऊन बाल विकास प्रकल्प विस्तार अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.ग्रामीण भागतील लहान मुलांच्या जीवाशी खेळू नका असा सवाल त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना उपस्थित केला.

 

कोहिडे  बुद्रुक गावठाण अंगणवाडीचे ३ वर्षापासून काम अपुरा निधीमुळे अर्धवट आहे.अनेकवेळा जिल्हा नियोजन समितीच्या आढाव्यात हा विषय झाला.जिल्ह्यातील अर्धवट अंगणवाड्यांना निधी उपलब्ध करून दिला.पण आत्तापर्यंत कोहिंडे बुद्रुक  अंगणवाडीला निधी मिळाला नाही.याचे कारण जिल्हा परिषदेचे अधिकारी सांगतात आमचे कडे रिपोर्ट आला नाही.पंचायत समितीचे सीडीपीओ सांगतात आम्ही तोंडी जीपला कळविले. बिचारी लहान मुले अडचणीत बसतात मात्र प्रशासनाला साधा रिपोर्ट करायला वेळ नाही.तालुक्याचे अधिकारी असे बेफिकीर वागत असून यांचेवर कारवाई व्हायला पाहिजे.
शरद बुट्टे पाटील - सदस्य,जिल्हा नियोजन समिती